मांढळची विदर्भस्तरीय दंगल शुक्रवारी रंगणार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

कुही (जि.नागपूर) : मांढळ येथील दीडशे वर्षांची परंपरा असलेली व राजे रघुजींच्या राजाश्रयाने सुरू झालेली मांढळ येथील भोलाहुडकीच्या नैसर्गिक हौदात रंगणारी दंगल पांडवपंचमीला म्हणजे शुक्रवारी (ता. 1 नोव्हेंबर) रंगणार आहे. 

कुही (जि.नागपूर) : मांढळ येथील दीडशे वर्षांची परंपरा असलेली व राजे रघुजींच्या राजाश्रयाने सुरू झालेली मांढळ येथील भोलाहुडकीच्या नैसर्गिक हौदात रंगणारी दंगल पांडवपंचमीला म्हणजे शुक्रवारी (ता. 1 नोव्हेंबर) रंगणार आहे. 
पांडवपंचमीला होणारी दंगल म्हणजे मांढळ व परिसरातील पंचवीस गावांतील वर्षभरातील सर्वांत मोठा उत्सव होय. या दंगलीच्या निमित्ताने दरवर्षी पहेलवानांचे मनोबल वाढविण्यासाठी मांढळ ग्रामपंचायत, आखाडा समिती स्थानिक आमदारांच्या सहकार्याने प्रसिध्द आहे. कलावंत, कुस्तीपटू यांना पाहुणे म्हणून बोलवितात. यापूर्वी दारासिंग, महाभारत व रामायण या मालिकेतील राम, श्रीकृष्ण यांची भूमिका साकारणारे कलावंत तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील मल्ल यांनी पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. यावर्षी नवनिर्वाचित आमदार राजू पारवे व माजी मंत्री राजेंद्र मुळक हे कोणता मोठा पाहुणा आणणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण मांढळच्या वैद्य चौकात झालेल्या विजयी रॅलीत राजेंद्र मुळक यांनी यंदा पांडवपचंमीला जल्लोष भोलाहुडकीवर करूया, असा शब्द दिला होता. त्यांच्याच प्रयत्नाने अभिनेता रितेश देशमुख पाहुणा म्हणून येणार असल्याची जोरदार चर्चा मांढळ परिसरातील युवकांमध्ये आहे. आखाड्यात येणारे मल्ल व परिसरातील हजारोंच्या संख्येने येणाऱ्या कुस्ती प्रेक्षकांची सुव्यवस्था व्हावी म्हणून मंगळवारी (ता. 29) ग्रामपंचायत मांढळ येथे अकरा वाजता कुहीचे तहसीलदार बी. एन. तिनघसे यांच्या मार्गदर्शनात आढावा बैठकीचे आयोजन केले आहे. भोलाहुडकीवरील या वीस हजार लोकक्षमतेच्या नैसर्गिक हौदवजा स्टेडियमचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. स्थानिक नेत्यांच्या आग्रही मागणीमुळे शासनाने विशेष लक्ष देऊन कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला. आताही बांधकाम सुरूच आहे. आता या नैसर्गिक हौदाला किल्ल्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. कुस्तीचे एवढे मोठे स्टेडियम कदाचित विदर्भात नसावे, असा अंदाज येथे भेट देणारे कुस्ती शौकीन व्यक्‍त करतात. या दंगलीच्या निमित्ताने येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी मांढळनगरी सज्ज झाली आहे. गरीब असो वा श्रीमंत सर्वांनी घराच्या रंगरंगोटीपासून सर्व तयारी केली आहे. दंगलीचे आयोजन सुव्यवस्थित व्हावे, म्हणून माजी जि.प.सदस्य उपासराव भुते, आखाडा समितीचे प्रभाकर राऊत, सरपंच शाहू कुलसंगे, उपसरपंच सुखदेव जिभकाटे, माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य राजेश तिवसकर, संजय निरगुळकर, आशीष आवळे, प्रदीप कुलरकर, पूनमचंद वासनिक, धनपाल लोहारे, मंगेश सलामे, गीता सोनकुसरे, गंगू दुपारे, मोना बुद्धे, संगीता मेश्राम, सुलोचना कंगाले, संगीता निरगुळकर, शांता शेंडे, शोभा नागदेवे, नलू डहारे, ग्रामविकास अधिकारी शरद दोनोडे हे परिश्रम घेत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The riotous riots of Manchali will take place on Friday