लहान मुलांमध्येही वाढतोय मधूमेहाचा धोका !

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

- तीन टक्के मुले जीएमसीत घेतात उपचार
- नियमीत व्यायामाचा तज्ज्ञांकडून सल्ला

अकोला : युवकांच देश म्हणून जगात ख्याती असलेल्या भारतात दिवसेंदिवस मधूमेहाचे प्रमाण वाढत आहे. त्यातून लहान मुलेही सुटली नसल्याचे दिसून येत आहे. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वाेपचार रुग्णालयात सुमारे 3 टक्के मुले हे मधूमेहासारख्या आजाराने ग्रस्त असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे 10 ते 20 वयोगटातील मुलांचे प्रमाण यामध्ये अधिक आहे. त्यामुळे मुलांनी कंम्युटर, लॅपटॉप, मोबाईलच्या खेळांना प्राधान्य न देता मैदानी खेळाकडे वळावे, नियमीत व्यायामही करावा असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिला जात आहे.

‘श्रीमंताचा आजार’ म्हणून ओळख असलेला मधूमेह आता प्रत्येक घराघरांमध्ये दिसनू येत आहे. आता यातून लहान मुलेही सुटलेली नसल्याचे तज्ज्ञ सांगतात. सात्विक खाण्याऐवजी फास्टफूडचा मारा लहान मुलांवर होत असल्याने लहान मुलांमधील लठ्ठपणाच्या समस्येत वाढ होत आहे. लठ्ठपणा हा कोणत्याही वयात वाईटच. पण लहान वयातील लठ्ठपणाचे परिणाम हे अधिक घातक असतात. लहानपणी स्थूल असलेली मुले मोठेपणीही स्थूल राहण्याची शक्यता अधिक असते. या मुलांना हृदयविकार, मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते. 

लहानपणी मुलांमधील वाढत्या चरबीचे प्रमाण अधिक असल्याचे दिसते. शारीरिक आजारांप्रमाणे मानसिक आजार, नैराश्याचे प्रमाण मुलांमध्ये वाढण्याचा धोका आहे. तर लहान वयात मधुमेह असणाऱ्या मुलांमध्ये अनुवांशिकतेने मधुमेह असल्याचे आढळत आहे. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राप्त माहितीनूसार वयाच्या 10 ते 20 वर्ष वयोगटातील मुलांमध्येही मधूमेहाचे प्रमाण पहायला मिळत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यातील मधूमेहाचा धोका टाळण्यासाठी मुलांनी संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. मैदाने खेळाकडे वळण्याचीही गरज निर्माण झालेली आहे.

लक्षणे
काहीच लक्षणे नसणे हेच या रोगाचे सामान्य लक्षण आहे. डायबेटिस गंभीर रूप धारण करेपर्यंत काहीही लक्षणे दाखवत नाही आण‌ि तो गंभीर झाल्यावरच तोंड वर काढतो, त्यामुळेच या रोगाला ' सायलेंट किलर ' असे म्हटले जाते. जवळपास 50 टक्के डायबेटिसग्रस्तांना या रोगाची दृश्य स्वरूपात काहीच लक्षणे आढळत नाहीत. ते अगदी सामान्य दिसतात. पण उर्वरित लोकांमध्ये काही लक्षणे दिसून येतात. वारंवार लघवी होणे, भरपूर तहान-भूक लागणे, अचानक वजन कमी होणे, दृष्ट‌दिोष निर्माण होणे, जखम लवकर बरी न होणे, लघवीच्या जागेवर वारंवार संसर्ग होणे ही लक्षणे सामान्यतः दिसून येतात.

असा असावा आहार
आहारातील कर्बोदकाचे प्रमाण मर्यादित असावे, रेषायुक्त (फायबर्स) पदार्थ आहारात असावेत, बेकरीचे पदार्थ व फास्ट फूड्‌सचा आहारातील वापर टाळावे, ताजी फळे व भाज्यांचा आहारात वापर असावा, झोपण्यापूर्वी अडीच ते तीन तास आधी जेवण घ्यावे, दोन वेळा भरपेट जेवण्यापेक्षा 3-4 तासांनी थोडाथोडा आहार घ्यावा.

अग्दी लहान मुलांमध्येही मधूमहाचे प्रमाण दिसून येत आहे. झपाट्याने बदलणारी जीवनशैली त्याला कारणीभूत ठरत आहे. भविष्यातील धोके टाळण्यासाठी डिजीटल माध्यमांपेक्षा मैदानी खेळाकडे आज वळणे गरजेचे आहे. शिवाय नियमीत व्यायामालाही प्राध्यान्य द्यावे.
- डॉ.मुकुंद अष्टपुत्रे, विभागप्रमुख, औषध वैद्यकशास्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the risk of diabetes is increasing even among young children