चाळिशीनंतरच स्ट्रोकचा धोका

छायाचित्र
छायाचित्र

नागपूर ः सर्वसाधारणपणे पुरुषांमध्ये साठीनंतर उद्‌भवणारा "ब्रेन स्ट्रोक'चा आजार वाढत्या ताणतणावांमुळे चाळिशीत दिसू लागला आहे. एकूण स्ट्रोकग्रस्त रुग्णांमध्ये साठ टक्के पुरुषांचे तर चाळीस टक्के महिलांचे प्रमाण आढळून आले आहे. तर स्ट्रोकमध्ये 30 टक्के रुग्णांना कायमचे दिव्यांगत्व येते. जगात होणाऱ्या स्ट्रोक हे "मृत्यू'चे तिसरे कारण आहे, अशी माहिती प्रसिद्ध मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिली.

मागील 25 वर्षांत ब्रेनस्ट्रोक रुग्णांमध्ये अतिशय गतीने वाढ झाली असून ही चिंताजनक आहे. दर दोन सेकंदात एकाला मेंदूचा पक्षाघात होत असून जगात 10 कोटी 70 लाख व्यक्तींना दरवर्षी स्ट्रोकमुळे बाधित होत असल्याचे पुढे आले आहे. यामुळेच
शासनस्तरावर "ब्रेन स्ट्रोक'चे प्रमाण नोंदविण्यासाठी, तसेच जनजागृतीसाठी विशेष उपक्रम हाती घेण्याची गरज आहे, असे मत जागतिक स्ट्रोक दिनाच्या पर्वावर डॉ. मेश्राम यांनी नोंदविले. विशेष असे की, दुबईत मेंदूरोग परिषद सुरू असून याच विषयावर चर्चा सुरू आहे. डॉ. रयुजी काझी, डॉ. मायकेल ब्रेनिन, डॉ. चंद्रशेखर मेश्राम सहभागी झाले आहेत.
उच्च रक्‍तदाब, मधुमेह हे आजार स्ट्रोकसाठी अत्यंत घातक ठरू शकतात. अनेकांना उच्च रक्‍तदाब, मधुमेहाचा त्रास असल्याचे माहिती नसते. अनेकांना शरीर देत असलेले संकेत कळत नाहीत किंवा ते सरळ त्याकडे दुर्लक्ष करतात. बोलताना अडखळायला होत असल्यास रुग्ण दंतचिकित्सकाकडे जातात. सौंदर्यतज्ज्ञांकडे जातात, पण मूळ समस्या "स्ट्रोक'ची असू शकेल हा विचारही त्यांच्या मनाला शिवत नाही. स्ट्रोकचे गांभीर्य कमी असल्यास रुग्ण 12 आठवड्यांमध्ये बरा होऊ शकतो. पाहणीतील नोंदींनुसार सुमारे 30 टक्‍के स्ट्रोक कमी गंभीर स्वरूपाचे, तर 60 टक्‍के गंभीर स्वरूपाचे असल्याचे दिसून आले. वेळेवर उपचार मिळाल्यास 60 टक्‍के रुग्णांचा जीव वाचू शकतो. लक्षणे दिसू लागल्यानंतर तीन तासांच्या आत मेंदूतज्ज्ञांशी संपर्क साधणे आवश्‍यक आहे, असे डॉ. रयुजी काझी म्हणाले.

लक्षणे...
-अशक्‍तपणा
-बोलताना अडखळणे
-पाहताना अडथळा
-डोकेदुखी, भोवळ येणे
मेंदूच्या एखाद्या भागाला रक्‍तपुरवठा होण्यात अडथळा झाल्यामुळे स्ट्रोक येतो. रक्‍तवाहिनीमध्ये गुठळी किंवा इजा पोहोचल्यास मेंदूला रक्‍त आणि ऑक्‍सिजनचा पुरवठा संपूर्णपणे बंद होतो. त्यामुळे बोलणे, पाहणे, गाडी चालविण्याचे कौशल्य यांना हानी पोहोचू शकते किंवा व्यक्‍ती पंगू बनू शकते. विशेष असे की, 80 टक्के रुग्ण दारिद्य्र रेषेखालील असतात. भारतात ब्रेन स्ट्रोकचे प्रमाण 20 टक्के आहे.
- डॉ. चंद्रशेखर मेश्राम, मेंदूरोगतज्ज्ञ, नागपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com