Vidhan Sabha 2019 कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्याला "वंचित'ची वाळवी

राम चौधरी
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

वाशीम : कॉंग्रेसचा बेलाग गड म्हणून ओळख असलेल्या रिसोड विधानसभा मतदारसंघात 2019ची निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरत आहे. अंतर्गत बंडखोरी उफाळून आल्यानंतरही कॉंग्रेसच्या विजयाचा इतिहास असलेल्या या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने सगळी राजकीय गणिते बदलविली आहेत.

वाशीम : कॉंग्रेसचा बेलाग गड म्हणून ओळख असलेल्या रिसोड विधानसभा मतदारसंघात 2019ची निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरत आहे. अंतर्गत बंडखोरी उफाळून आल्यानंतरही कॉंग्रेसच्या विजयाचा इतिहास असलेल्या या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने सगळी राजकीय गणिते बदलविली आहेत.
रिसोड विधानसभा मतदारसंघ कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात आतापर्यंत दोन अपवाद वगळता कॉंग्रेस कायम विजयी पताका फडकवीत आली आहे. मात्र, 2019ची विधानसभा निवडणूक या मतदारसंघात कॉंग्रेससाठी अस्तित्वाची लढाई ठरत आहे. कॉंग्रेसचे माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या बंडखोरीने धास्तावलेली कॉंग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या एंट्रीने घायाळ होत असल्याचे चित्र आहे. कॉंग्रेसचा जनाधार असलेला मुस्लिम व अनुसूचित जातीचा वर्ग मागील लोकसभा निवडणुकीतच वंचितच्या राहुटीत डेरेदाखल झाला होता. आताही आमदार अमित झनक यांच्याकडून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिलीप जाधव यांच्या रूपाने मतांच्या गठ्ठ्यात मोठा वाटेकरी निर्माण झाला आहे. माजी खासदार अनंतराव देशमुख व माजी मंत्री सुभाष झनक यांच्यात या आधीही कॉंग्रेस विरुद्ध अपक्ष असा सामना रंगला होता.
2009च्या निवडणुकीत त्या वेळी सुभाष झनक यांचा निसटता विजय झाला होता. त्यांना मालेगाव तालुक्‍यातील मताधिक्‍याने तारले होते. लोकनेते डॉ. अरुण इंगोले यांच्या समर्थकांनी झनकांच्या पारड्यात मतदान टाकले होते. मात्र, आता या निवडणुकीत डॉ. अरुण इंगोले यांची तत्कालीन सहकारी दिलीप जाधव वंचितच्या उमेदवारीने निवडणूक रिंगणात असल्याने कॉंग्रेसला तारणारा मालेगाव तालुका तिघांमध्ये विभागला जाणार असल्याने कॉंग्रेससाठी या मतदारसंघाची निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: risod vidhansabha constituency