शहरातील नद्यांची स्वच्छता यंदाही लोकसहभागातून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

नागपूर  - लोकसहभाग आणि शहरातील नद्यांची स्वच्छता असे आता समीकरणच झाले आहे. सामाजिक संस्था, नागरिकांच्या सहकार्याने यंदाही नाग, पिवळी व पोरा नदी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. 17 एप्रिलपासून या अभियानाला प्रारंभ करण्यात येणार असून उद्या, 12 रोजी महापालिकेत या अभियानावर खल होणार आहे. महिनाभर ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

नागपूर  - लोकसहभाग आणि शहरातील नद्यांची स्वच्छता असे आता समीकरणच झाले आहे. सामाजिक संस्था, नागरिकांच्या सहकार्याने यंदाही नाग, पिवळी व पोरा नदी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. 17 एप्रिलपासून या अभियानाला प्रारंभ करण्यात येणार असून उद्या, 12 रोजी महापालिकेत या अभियानावर खल होणार आहे. महिनाभर ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

2013 पासून तत्कालीन महापौर प्रा. अनिल सोले यांनी नागनदी स्वच्छ करण्यासाठी लोकसहभागातून अभियानाचा पाया रचला.

नागनदीसोबतच पिवळी नदी तसेच पोरा नदी स्वच्छतेचीही मोहीम गेल्या काही वर्षांत सुरू करण्यात आली. आता शहरातील तिन्ही नद्यांच्या स्वच्छतेसाठी अभियान राबविले जात आहे. यंदा 17 एप्रिलपासून नदी स्वच्छता अभियानाला प्रारंभ करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांत प्रामुख्याने नागनदी स्वच्छतेवर भर देण्यात आला. यातूनच नागनदी सौंदर्यीकरणाचा तसेच नागनदीतील पाणी शुद्ध करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्राचा आराखडा तयार झाला असून केंद्राने दोन्ही आराखड्यांना मंजुरी दिली आहे. 2500 कोटींचे हे दोन्ही विकास आराखडे असून लवकरच निधी मिळण्याची शक्‍यता आहे. यंदा नदी स्वच्छता अभियान पश्‍चिमेतून सुरू झालेल्या उत्तर नागपूरमार्गे पूर्व नागपुरात नागनदीला मिळालेल्या पिवळी नदीतून स्वच्छता अभियानाला प्रारंभ करण्यात येणार आहे. नदी स्वच्छतेनंतर काही दिवसांत नागरिक नदीत कचरा, माती पुन्हा टाकत असल्याचा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे दरवर्षी स्वच्छता अभियान राबवून नद्या स्वच्छ करण्यात येतात. यंदाही सामाजिक संस्था, नागरिकांचे सहकार्य या मोहिमेसाठी घेण्यात येणार आहे. उद्या, 12 रोजी महापालिकेत यावर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

पावसाळ्यापूर्वी नदी स्वच्छतेमुळे गेल्या काही वर्षांत शहरात पावसाचे पाणी जमा होत नसून नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

यंदा उत्साह द्विगुणित
महापालिका निवडणुकीनंतर अनेक नवे नगरसेवक निवडून आले आहेत. 108 सदस्य निवडून आलेल्या भाजपमधील अनेक नव्या नगरसेवकांत या मोहिमेबाबत उत्सुकता आहे. यंदा नाग नदीसोबतच पिवळी नदीच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

Web Title: river cleaning by public