आरजे शुभमचा दुर्दैवी मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

नागपूर- एखाद्या कलावंताला रंगमंचावर मृत्यू येणे भाग्याची गोष्ट समजली जाते. लाइव्ह शोमध्ये आपल्या संवादशैलीतून श्रोत्यांना खिळवून ठेवणारे रेडिओ जॉकी (आरजे) हेदेखील खरे कलावंतच. पण, आज (गुरुवार) आपला नियमित शो करताना मध्यांतरातच जगाचा निरोप घेणारा नागपुरातील तरुण आरजे शुभम (22) याच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. 

'रेडिओ मिर्ची'वरील "मॉर्निंग शो'मधून आरजे शुभम खेचे याने अवघ्या दोन वर्षांमध्ये श्रोत्यांच्या मनात घर केले होते. आजसुद्धा शुभमचा सकाळी सात ते अकराचा "हाय नागपूर' हा मॉर्निंग शो सुरू होता. दरम्यान, त्याला छातीत दुखू लागल्याने तो रेकॉर्डिंग रूममधून बाहेर आला आणि बाथरूममध्ये गेला. बाथरूममधून बाहेर आल्यावर त्याने छातीत दुखत असल्याचे सर्वांना सांगितले आणि त्याच वेळी खाली कोसळला. त्याला तातडीने सदर येथील नजीकच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्याने तातडीने ऍम्बुलन्स बोलावून मेयोमध्ये नेण्यात आले. पण, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदनानंतर प्रथमदर्शनी शुभमला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात आले. शुभम हा रेडिओवर "मॉर्निंग शो' करणारा देशातील सर्वांत तरुण आरजे होता, असे म्हटले जाते. 
शुभमची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. त्याचे वडील काही वर्षांपूर्वीच गेले. वडिलांनी धंतोली येथे सुरू केलेली चहाची टपरी शुभम व त्याची आई सांभाळायचे. लहान बहीण सायली बारावीला आहे. सीताबर्डी येथे एका किरायाच्या घरात तो, त्याची आई व बहीण राहायचे. अतिशय बिकट परिस्थितीवर मात करून शुभम आपल्या कौशल्याच्या जोरावर रेडिओ जॉकी झाला. या क्षेत्रात त्याची उत्तरोत्तर प्रगती होत असल्यामुळे परिस्थिती सुधारेल, असा विश्‍वास होता. परंतु, काळाने घात केला आणि एका तरुण आरजेच्या स्वप्नांचा करुण अंत झाला. 
 
Web Title: RJ shubham dies of heart attack