video : अंत्यसंस्काराला जाताना शोधावी लागते वाट 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

घाटंजी तालुक्‍यापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर नदीकाठी खापरी नावाचे गाव वसलेले आहे. पुरोगामी, विकसित आणि उन्नत म्हणून मिरवणाऱ्या व्यवस्थेला हे गाव सणसणीत चपराक आहे. 

यवतमाळ : एक ना एक दिवस प्रत्येकाला मरायचे आहे, हे अटळ सत्य आहे. यापासून आजवर कुणीही वाचलेला नाही. जीवन जगण्यासाठी माणसाला आयुष्यभर संघर्ष करावा लागतो. मोठा खर्च करावा लागतो. आपल्या, कुटुंबाच्या सुखी आयुष्यासाठी त्याची धडपड सुरू असते. यासाठी तो नानाविध कार्य करीत असतो. नोकरी, व्यवसाय, मजुरी आदी कामे करून संसाराचा गाढा हाकत असतो. सुखी आयुष्यासाठी त्याचे सतत प्रयत्न सुरू असते. 

जिवण्याच्या शेवटी अंत्यसंस्कार पूर्ण सोपस्काराने पार पडावी ही प्रत्येकाची इच्छा असते. श्रीमंत व्यक्‍तींना याची काहीही काळजी नाही. मात्र, गरिबांचे काय? ज्यांचे जीवनच संघर्षात गेले ते काय करणार? हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचे हाल अजूनच बेकार होते.

प्रत्येक गावात स्मशानभूमी असावी, यासाठी सर्वजण लढा देत असतात. स्मशानभूमी आहे; मात्र सोय नाही, असे आपण अनेकदा पाहिले व वाचले आहेत. स्मशानभूमी आहे; मात्र जायलाच रस्ता नसेल तर नागरिकांनी काय करावे अशा प्रश्‍न पडतो. 

Image may contain: 1 person, standing, crowd and outdoor
अंत्यसंस्कारासाठी नदीतून जाताना नागरिक

मरणानंतरही खापरीवासीयांना मरण यातना
शहरात सर्वत्र रस्ते आहेत. त्या तुलनेत ग्रामीण भागात रस्ते नाही. त्यामुळे नागरिकांची नेहमी कोंडी होत असते. गावातच रस्ते नाही तर स्मशानभूमीचा विचार न केलेलाच बरा... यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्‍यात असलेल्या खापरी गावात नागरिकांना जिवंतपणीच नाही तर मेल्यानंतरही प्रशासनाच्या ढिसाळ धोरणाचा सामना करावा लागत आहे. गावात पक्के रस्ते सोडाच पण स्मशानभूमीत जायलाही साधा रस्ता नसल्याने चार फूट पाण्यातून अंत्ययात्रेला जावे लागत असल्याने मरणानंतरही खापरीवासीयांना मरण यातना सोसाव्या लागत आहेत. 

हेही वाचा - #Bad News मरणही झाले खर्चिक!

घाटंजी तालुक्‍यापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर नदीकाठी खापरी नावाचे गाव वसलेले आहे. पुरोगामी, विकसित आणि उन्नत म्हणून मिरवणाऱ्या व्यवस्थेला हे गाव सणसणीत चपराक आहे. या गावात रस्ते, नाल्या, शिक्षण आरोग्य सुविधांचा बोजवारा उडालेला आहे. रस्ते आजच्या काळाची गरज आहे. रस्त्यांशिवाय विकास अशक्‍य आहे. नागपूर शहरात सर्वत्र सिमेंट रस्त्यांचे जाळे विणले जात आहे. दुसरीकडे यवतमाळसारख्या मोठ्या जिल्ह्यात रस्त्यांची समस्या आहे. 

पाण्यातूनच वाट काढवी लागते
येथील खापरी गावात रस्ते नाही. स्मशानभूमी गावापासून दूर आहे. विशेष म्हणजे स्मशानभूमीत जाण्यासाठी साधा रस्ता देखील नाही. यामुळे नागरिकांना नाहक समस्यांच्या समना करावा लागत आहे. दुसरीकडे स्मशानभूमीच्या रस्त्यात नदी लागते. नदीत वर्षभर चार ते पाच फूट पाणी राहते. या नदीवर पूल नसल्याने नागरिकांना पाण्यातूनच वाट काढवी लागते. यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. याकडे संबंधिक विभागाने लक्ष देऊन समस्या सोडविण्याची गरज निर्माण झाली आहे. 

Image may contain: one or more people, people sitting, crowd, outdoor and water

नागरी सुविधांचा बोजवारा
तालुक्‍याला लागूनच असलेल्या या गावात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. नदीकाठी असलेले संगमेश्‍वर देवस्थान पर्यटनाला चालना देणारे आहे. मात्र, तिथेही रस्ते नसल्याने गावाची दशा दिसू लागली आहे. 
- संतोष माहुरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: road problem in khapari of yavatmal district