पुण्याच्या रस्त्यावर संत्री विकणारा अभियंता

पुण्याच्या रस्त्यावर संत्री विकणारा अभियंता

नागपूर - कोणी हमीभाव मागतो, काहींना पॅकेज हवे असते, काही जण सत्ताधाऱ्यांना शिव्याशाप देऊन नुसते राजकारण करतात. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कोणी काहीच करीत नाही. मात्र, विदर्भातील एक तरुण अभियंता नागपुरी संत्री घेऊन पुण्यातील रस्त्यावर विकतो, एवढेच नव्हे तर आपल्या अभियांत्रिकी कौशल्याने शेतकऱ्यांना थेट आयटी कंपन्यांना कनेक्‍ट करतो, त्यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळवून देतो. ही आपुलकी जपली आहे अभिजित फाळके यांनी.

अभिजित यांनी गुरुवारी सकाळ कार्यालयाला भेट देऊन संवाद साधला. शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. संघटनेच्या मर्यादा असल्याने सर्व सोडवणे शक्‍य नाही. शिवाय नाक दाबल्याशिवाय सरकार तोंड उघडत नाही. यामुळे राजकीय दबावगट निर्माण करण्याचेही त्यांनी ठरविले आहे. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळावा असे प्रामाणिकपणे राजकीय पक्षांना वाटत असेल तर एक तरी निवड फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर लाढावी, असे आवाहन त्यांचे आहे.

अमिताभ बच्चन यांच्या "कोन बनेगा करोडपती' कार्यक्रमात यवतमाळमधील शेतकऱ्याच्या विधवेच्या दुःखाने हळव्या झालेल्या अभिजित यांना रात्रभर झोप लागली नाही. शेतकऱ्यांसाठी काही तरी करायचेच असे मनोमन ठरविले. त्यातून आपुलकी संस्थेचा जन्म झाला. विदर्भातील असल्याने सर्वप्रथम संत्र्याला हात घातला. विविध कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये संत्र्यांचे स्टॉल लावले. स्वतः रस्त्यावर उभा झालो. याचे फळ मिळाले. संत्र्यांची तब्बल 44 लाखांची उलाढाल एकाच मोसमात झाली. "उड्डाण' नावाच्या ऍग्रीकल्चर शिबिरातून माती परीक्षण, बदलती पीक पद्धती, पेरणीसंबंधी मार्गदर्शन केले जाते, असेही त्यांनी सांगितले.

...
"ऍग्रीकल्चर टूल बॅंक' कन्सेप्ट
साडेचार वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या "आपुलकी'ने शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या असता त्यांना मजुरांची प्रचंड कमतरता जाणवत असल्याचे लक्षात आले. त्यासाठी संस्थेने ऍग्रीकल्चर टूल बॅंक कन्सेप्ट आणली. शेतीउपयोगी सर्वच साहित्य खरेदी करून गरजवंत शेतकऱ्यांना त्यामाध्यमातून लागेल ती मदत केली जाते. अनेक शेतकरी याचा लाभ घेत आहेत.

सचिन तेंडुलकरला दिले गाव
आपुलीसाठी प्रसिद्ध क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी खूप मदत केली. त्यांनी थेट सचिन तेंडुलकर यांच्याशी भेट घालून दिली. सचिनने एका मेसेजवर ट्रॅक्‍टर मिळवून दिला. खासदार झालेल्या सचिनला गाव दत्तक घेण्यासाठी संस्थेने मदत केली. आता यवतमाळ जिल्ह्यातील एक गाव सचिनने दत्तक घ्यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सरकार दखलच घेत नाही
शेतकऱ्यांसाठी संस्थेमार्फत अनेक उपक्रम राबविले. त्याकरिता सरकारची मदत घेण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या हितासाठी काही सूचना केल्या. आता राज्यातील फक्त सत्ताधारी बदलले. मात्र, शेतकऱ्यांची दखल कोणी घेत नाही, अशी खंत अभिजित फाळके यांनी व्यक्त केली.

कृषिमूल्य आयोग बोगस
आपल्या देशात कृषिमूल्य आयोगासारखी दुसरी कुठली बोगस समिती नाही. ज्यांना शेती, शेतकरी, शेतमालाचा गंध नाही, त्यांच्याविषयी जिव्हाळा नाही असे लोक बसून शेतमालाचे हमीभाव ठरवितात. ज्यांना फक्त व्यवसायच समजतो ते लोक देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांचे हाल करीत असल्याचे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com