रस्त्यांच्या निकृष्ट कामांवर ‘लिपापोती’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

नागपूर - ‘जनमंच’ने सिमेंट रस्त्यांचे ‘पब्लिक ऑडिट’ करण्यास प्रारंभ करताच कंत्राटदारांनी निकृष्ट दर्जा लपविण्यासाठी खटाटोप सुरू केल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे सायंकाळी लॉ कॉलेज सिमेंट रस्त्यांवरील आयब्लॉक काढण्यास सुरुवात केली. यावरही जनमंचने आक्षेप घेतला. 

पब्लिक ऑडिटच्या निमित्ताने आयुक्त अश्‍विन मुदगल यांनी त्रयस्थ संस्थेतर्फे चौकशीही सुरू केली असून, दोन दिवसांत महापालिकेकडे अहवाल येणार आहे.

‘जनमंच’ या संस्थेने सोमवारी लॉ कॉलेज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या सिमेंट रस्त्याचे पब्लिक ऑडिट केले. यामुळे कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहे. सिमेंट रस्त्यांच्या निकृष्ट दर्जावर पांघरूण घालण्यासाठी कंत्राटदारांनी आक्षेप घेतलेली कामे दुरुस्ती करण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे. लॉ कॉलेज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर लावलेले आय ब्लॉक काही महिन्यांतच निघाले. काल आयुक्तांनीही सिमेंट रस्त्यांची तपासणी सुरू केली. या तपासणीतून कामाचा निकृष्ट दर्जा पुढे येऊ नये, यासाठी कंत्राटदाराने आय ब्लॉक जेसीबीने काढण्यास प्रारंभ केला. यामुळे कंत्राटदाराने केलेल्या कामाबाबत शंका निर्माण झाली आहे.

सिमेंट रस्त्यावरील आय ब्लॉक काढून दुरुस्ती सुरू झाल्याचे कळले. लोकांचीही हीच अपेक्षा आहे. मात्र, जे लोकांना दिसते ते महापालिकेतील अभियंते, सल्लागार, आर्किटेक्‍टला का दिसत नाही, असा प्रश्‍न आहेच. लोकांच्या करातून सिमेंट रस्ते होत आहे. त्यामुळे ते लोकांसाठी चांगले व्हावे, यासाठी पब्लिक ऑडिट करण्यात येत आहे.
- ॲड. अनिल किलोर, अध्यक्ष, जनमंच.

सिमेंट रस्त्यांच्या कामाचा दर्जा निकृष्ट निघाल्यास कंत्राटदारांची बिले रोखण्यात येईल. त्यांच्यावर कारवाईही करण्यात येईल. स्वतः सिमेंट रस्त्यांची पाहणी करणार असून, नागरिकांनीही महापौर कार्यालयाशी संपर्क साधून सिमेंट रस्त्यांच्या तक्रारीची नोंद करावी. रस्त्याच्या बाजूच्या स्टार्म ड्रेन लाइनची पाहणी करणार आहे. 
- नंदा जिचकार, महापौर.

पब्लिक ऑडिटच्या निमित्ताने एनएबीएल या मान्यताप्राप्त संस्थेच्या माध्यमातून सिमेंट रस्त्यांची तपासणी करण्यात येत आहे.

आयआरडीपीअंतर्गत रस्ते बांधकामातील वाचलेले आय ब्लॉक वापरण्याची तरतूद आहे. त्यामुळे महापालिकेचे पैसे वाचतील. परंतु, चुकीचे कामे असेल, तर दंड झालाच पाहिजे, ही महापालिकेची भूमिका आहे.
- अश्‍विन मुदगल, आयुक्त.

Web Title: road work Disgusting