लोखंडी सळईचा धाक दाखवून घरावर दरोडा

अनिल दंदी
रविवार, 29 जुलै 2018

बाळापूर तालुक्यातील पारस येथील यादव वस्तीवर पाच जणांनी दरोडा टाकून 1 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लंपास केला आहे. दरोडेखोरांनी दाम्पत्याला लोखंडी सळईचा धाक दाखवून घरातील सोने चांदीचे दागिने व रोख पैसे काढून घेतले आहेत. दरोड्याची घटना आज रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत कलावती यादव (48) जखमी झाल्या आहेत.

अकोला- बाळापूर तालुक्यातील पारस येथील यादव वस्तीवर पाच जणांनी दरोडा टाकून 1 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लंपास केला आहे. दरोडेखोरांनी दाम्पत्याला लोखंडी सळईचा धाक दाखवून घरातील सोने चांदीचे दागिने व रोख पैसे काढून घेतले आहेत. दरोड्याची घटना आज रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत कलावती यादव (48) जखमी झाल्या आहेत.

घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलीसांचा ताफा घटनास्थळी हजर झाला. बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पारस येथील रहिवाशी प्रेमलाल यादव हे शासकीय सेवेत आहेत. सरस्वती विद्यालयाच्या पाठीमागे असलेल्या बंगल्यात ते पती-पत्नी व एका मुलासह वास्तव्यास आहेत. शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे ते झोपलेले असतांना रविवारी पहाटे 3 वाजता अज्ञात दरोडेखोरांनी बंगल्याचे पाठीमागील गेट तोडून आत प्रवेश केला.

दोघेजण बंगल्या बाहेर तर तीनजण बंगल्यात शिरले. बंगल्यात शिरल्या बरोबर ते वरच्या मजल्यावर गेले. वरती एका खोलीत यादव यांचा मुलगा विनोद हा झोपलेला होता. त्याच्या खोलीचे दार बाहेरून लावून घेतले. त्यानंतर दरोडेखोरांनी दाम्पत्य झोपलेल्या खालच्या खोलीत दरवाजा तोडून प्रवेश केला. प्रथम कलावती यादव यांच्या डोळ्यासमोर बॅटरी धरत लोखंडी सळईचा धाक दाखवून कपाटाच्या चाव्या मागीतल्या. व त्यानंतर प्रेमलाल यांनाही धाक दाखवत तसेच पडून राहण्याचे सांगितले. दरोडेखोर मराठी आणि हिंदी बोलत होते.

तिघांपैकी चेहऱ्यावर स्कार्फ ओढलेल्या एकाने कलावती यांना सोन्याच्या दागिन्यांची मागणी करताच त्यांनी ओरडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सर्वात ठेंगणा असलेल्या एकाने कलावती यांच्या डाव्या कानावर व मानेवर सळईने मारहाण केली. या मारहाणीत त्या जखमी झाल्या. सोने लोखंडी कपाटात असल्याचे सांगितल्याने कपाट तोडून दरोडेखोरांनी चांदीचा अर्धा किलो वजनाचा कंबरपठ्टा, किंमत 15 हजार रुपये, चांदीची लछी, 15 हजार रुपये, 20 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या किंमत 40 हजार रुपये, गळ्यातील साखळी 20 हजार रुपये, मंगळसुत्र 12 हजार रुपये, एक डोरले व तीस मणी 12 हजार रुपये, दोन कर्णफुल 6 हजार रुपये व नगदी 12 हजार रुपये, असा एकूण एक लाख वीस हजार रुपयांचा ऐवज घेऊन दरोडेखोरांनी बंगल्याच्या पाठीमागील जंगलातून पळ काढला.

Web Title: Robbery at home by showing iron rods