अमरावतीच्या नागार्जुन कॉलनीत दरोड्याचा थरार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

अमरावती : स्थानिक तपोवन भागातील नागार्जून कॉलनीत मंगळवारी (ता. 22) पहाटे पाच दरोडेखोरांनी सेवानिवृत्त टपाल कर्मचाऱ्याच्या घरात पंधरा मिनिटे धुमाकूळ घालत कुटुंबीयांना क्रूरपणे मारहाण केली. एका लहान मुलासह कुटुंबातील चौघांवर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. पैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.

अमरावती : नागार्जून कॉलनीत मंगळवारी (ता. 22) पहाटे पाच दरोडेखोरांनी सेवानिवृत्त टपाल कर्मचाऱ्याच्या घरात  धुमाकूळ घालत कुटुंबीयांना मारहाण केली. सेवानिवृत्त टपाल कर्मचारी रामदास गुलाब खवले (वय 71), त्यांच्या पत्नी सुमन (वय 62), फार्मा कंपनीत प्रादेशिक व्यवस्थापक मुलगा अतुल (वय 40), सून चैताली (वय 30) व मुलीचा मुलगा (नातू) श्रेयस अनिल ढोरे (वय 16) आणि नातवंड घरात झोपले होते. पहाटे 2.25 च्या सुमारास टी-शर्ट व बरमुडा परिधान केलेले व तोंडाला रूमाल बांधलेले 5 दरोडेखोर परिसरात दाखल झाले. त्यांनी सर्वप्रथम परिसरात बांधकामावरील चौकीदार विठ्ठल वाघमारे यांचे हातपाय बांधले. त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन गप्प राहण्याचे सांगितले. त्यानंतर दरोडेखोरांनी रामदास खवले यांच्या घराकडे मोर्चा वळविला.
खवले यांच्या घराचे दार मोठ्या दगडाने तोडून दरोडेखोर घरात शिरले. दार तोडण्याच्या आवाजाने कुटुंब जागे होताच दरोडेखोरांनी रामदास खवले, अतुल खवले व श्रेयस यांच्यावर काठ्यांनी हल्ला चढविला. यामध्ये चौघेही गंभीर जखमी झाले. त्यानंतर दरोडेखोरांनी सुमन खवले यांची कर्णफुले हिसकली. दोन वर्षांच्या मुलास उचलून दूर फेकले. घरात हा प्रकार सुरू असताना चैताली यांनी मदतीसाठी पोलिस नियंत्रण कक्षाला 2.28 व 2.32 मिनिटांनी कॉल केला, मात्र नियंत्रण कक्षातून प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान प्रतीकार करीत कुटुंबातील सदस्यांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केल्याने दरोडेखोरांनी तेथून पळ काढला.
माहिती मिळताच गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. दरोडेखोरांच्या मारहाणीत रामदास खवले यांचा हात निकामी झाला, अतुल खवले आणि श्रेयस हेसुद्धा जखमी झाले. त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले; तर कर्णफुले हिसकावून घेतल्याने सुमन खवले यांच्या कानाला दुखापत झाली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी ठसेतज्ज्ञ व श्‍वान पथकालाही पाचारण करण्यात आले. पोलिस उपायुक्त यशवंत सोळंके यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कैलास पुंडकर यांनीही घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. रामदास खवले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात पाच दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरोडेखोरांचा शोध सुरू आहे. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागरिक धडकले आयुक्तालयात
शिवसेनेचे पदाधिकारी अमोल निस्ताने, माजी नगरसेविका स्वाती निस्ताने यांच्यासह परिसरातील नागरिकांनी सायंकाळी आयुक्तालयावर धडक दिली. पोलिस आयुक्त संजय बाविस्कर यांना निवेदन देऊन परिसरासाठी मंजूर असलेले पोलिस ठाणे तत्काळ सुरू करावे, पोलिस ठाणे अस्तित्वात येईपर्यंत अस्थायी पोलिस चौकी उघडण्यात यावी, गाडगेनगर-फ्रेजरपुरा पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A robbery in the Nagarjuna colony of Amravati