video : आश्‍चर्य! लेडी रोबो साधते ग्राहकांशी संवाद 

मनीषा मोहोड 
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

> जपानचे रोबोट झाले नागपुरात वेटर 
> खास जपानी तंत्रज्ञानाचा वापर केला 
> रोबोला रोबो ब्युटी येलो, रोबो ब्युटी रेड आणि रोबो ब्युटी ग्लोडन अशी नावे दिली 
> रोबो संबंधित टेबलची ऑर्डर घेऊन काही मिनिटातच ग्राहकांसमोर होतो हजर 

नागपूर : हॉटेलमध्ये गेलो की आपली ऑर्डर घेण्यासाठी वेटर आपल्या दिमतीला उभे असतात. मागितलेला पदार्थ तयार झाली की तो आणून देणे, पाणी, बील असे हवे नको ते सगळे देण्यासाठी ते हजर असतात. पण हे काम रोबोने केले तर? ही गोष्ट आता तंत्रज्ञानामुळे शक्‍य झाली आहे. विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान आता उपराजधानीतही उपलब्ध झाले आहे. 

 

नागपूरमध्ये अशाप्रकारे रोबो वेटर हॉटेल सुरू झाले असून त्याचे नुकतेच उद्‌घाटन करण्यात आले आहे. नागपूरमधील सीताबर्डी येथील इटरनिटी मॉलमध्ये दुसऱ्या मजल्यावर रोबो 2. 0 नावाने रेस्टॉरेंट सुरू केले असून, यात जपान येथून तीन रोबो वेटर दाखल झाले आहेत. या रोबोला रोबो ब्युटी येलो, रोबो ब्युटी रेड आणि रोबो ब्युटी ग्लोडन अशी नावे देण्यात आली आहेत. ग्राहकांनी दिलेल्या ऑर्डरची कमांड हॉटेलचे व्यवस्थापक आपल्या टॅबमार्फत रोबोला देतात. त्याप्रमाणे रोबो किचनमधून, संबंधित टेबलची ऑर्डर घेऊन काही मिनिटातच ग्राहकांसमोर हजर होतात. 

No photo description available.
वेटरचे काम करताना रोबोट 

यासाठी खास जपानी तंत्रज्ञानाचा वापर केला असून, रोबोला फिरण्यासाठी हॉटेलच्या फ्लोअर वर वैशिष्टपूर्ण मॅगनेटीक चिप बसवून, "रोबो वे' तयार केला आहे. तुम्ही त्या रोबो वे वर उभे असल्यास, लेडी रोबो तुम्हाला अतिशय अदबीने आमच्या वे वरून पाय काढण्याची विनंती करतांना दिसते. याशिवाय तुमची ऑर्डर आलेली आहे, तुम्हाला अजून काही हवे का, तुमचा दिवस शुभ असो असा संवादही रोबो इंग्रजी भाषेत आपल्या विशिष्ट शैलीत साधताना दिसतो. 

फॅशनेबल रोबोसोबत सेल्फी

नागपूरकरांना हॉटेलमधील लेडी रोबोचे मोठे आकर्षण वाटत आहे. या रोबोला पाहण्यासाठी हॉटेलमध्ये गर्दी होत आहे. महाविद्यालयीन तरुण तरुणी या लेडी रोबो सोबत सेल्फी घेत आहेत. रोबोला रोज नवीन लुक दिला जात असून, गळ्यात स्कार्फ, टोपी, हेडफोन असा फॅशनेबल लुक देण्यात आला आहे. याशिवाय सण, उत्सव असल्या, लेडी रोबोला स्कर्ट, साडी, ख्रिसमस ड्रेस असा लुक दिला जाणार असल्याचे हॉटेल व्यवस्थापकांनी सांगीतले. 

No photo description available.

महाराष्ट्रात पहिलाच प्रयोग

भारतात चेन्नई, हैद्राराबाद, बंगळुरु, रायपुर आणि भुवनेश्‍वर येथे काही हॉटेलमध्ये रोबो वेटर सेवा देत आहेत. मात्र, महाराष्ट्रात अद्यापही हा प्रयोग करण्याचे कुठल्याही हॉटेल व्यवसायिकांनी धाडस केले नाही. नागपूरमध्ये अशा प्रकारचा प्रथमच प्रयोग महाराष्ट्रात केला आहे. जपान येथील टीमने या रोबोला हॉटेलमध्ये आणून सोडले असून, त्यांची सिस्टीम हॉटेल मालक व व्यवस्थापकांना समजावून सांगितली आहे. हे रोबो बॅटरीवर चालत असून, बॅटरी चार्ज केल्यावर रोबो काम सुरू करतो. याशिवाय काही अडचन आल्यास जपान च्या टिमसोबत व्हिडीओ कॉलींग करून, रोबोची अडचण सोडविली जाते. 

नागपूरकरांनी या रोबोला पाहावे
महाराष्ट्रात प्रथमच रोबो वेटरचा प्रयोग नागपूरकरांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत. ग्राहकांना हेल्थी फूड सोबत तंत्रज्ञानाच्याही जवळ घेऊन जाण्याचा प्रयत्न यातून करण्यात येत आहे. नागपूरकरांनी वैयक्तिकरित्या येऊन या रोबोला पाहावे. भविष्यात ग्राहकांच्या मागणीनूसार रोबोच्या फिचर्स आणि त्यांच्या लुकमध्येही बदल करण्यात येईल. 
- संदीप शेंडे, 
मॅनेजर, रोबो 2. 0. रेस्टॉरेंट, नागपूर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Robot becomes waiter in Nagpur