दुर्मिळ 'रोझी पिपिट'ची अकोल्यात नोंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

अकोल्यातील कुंभारी येथे आढळलेला पक्षी "रोझी पिपिट' आहे. "बीएनएचएस' लवकरच त्याच्या नोंदीची औपचारिकता पूर्ण करणार आहे.
- राजू कसंबे, प्रकल्प अधिकारी, "बीएनएचएस'

अकोला - स्थलांतर केल्यावर हिमालय पर्वताच्या आणि आसाममधील डोंगराळ भागाच्या पायथ्याशी वास्तव्य करणाऱ्या "रोझी पिपिट' या दुर्मिळ पक्ष्याची मध्य, पश्‍चिम, दक्षिण भारतातील पहिली नोंद अकोल्यात झाली आहे. पक्षिमित्र रवी धोंगळे आणि विष्णू लोखंडे यांना हा "रोझी पिपिट' कुंभारी तलावाजवळ आढळला. या नोंदीवर बॉंबे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (बीएनएचएस) शिक्कामोर्तब केले आहे.

रवी धोंगळे कुंभारी येथील तलावावर पक्षिनिरीक्षणासाठी गेले असता, त्यांना तलावाच्या दक्षिणेकडे हा पक्षी दिसला. नेहमीपेक्षा वेगळा पक्षी आढळल्याने त्यांनी काळजीपूर्वक निरीक्षण केले. गवतामध्ये चरत असलेल्या या पक्ष्याचे वर्तन अस्थिर होते. तो सतत जागा बदलत होता. त्यामुळे महत्प्रयासाने त्याचे छायाचित्र घेणे शक्‍य झाले. त्यानंतर त्यांनी माहिती घेण्यासाठी पक्ष्यांची माहिती देणारी पुस्तके आणि इंटरनेटवर धांडोळा घेतला, त्या वेळी मिळालेली माहिती आश्‍चर्याचा सुखद धक्का देणारी होती. पण, तो "रोझी पिपिट'च आहे याची खात्री करण्यासाठी त्यांनी पक्ष्यांची छायाचित्रे नाणावलेले पक्षी अभ्यासक निनाद अभंग आणि "बीएनएचएस'चे प्रकल्प अधिकारी राजू कसंबे यांना पाठविली. दोघांनीही "रोझी पिपिट'च्या अकोल्यातील वास्तव्यावर शिक्कामोर्तब केले. याबाबत ज्येष्ठ निसर्गतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांनाही माहिती देण्यात आली. त्यांनी अभिनंदन करीत "बीएनएचएस'कडे नोंद करण्याची कार्यवाही लवकर करण्याचा सल्ला दिला.

अफगाणिस्तानात वास्तव्य
अफगाणिस्तान आणि दक्षिण कोरियात मूळ वास्तव्य असलेल्या "रोझी पिपिट'ची वीण चीनमध्ये होते. हिवाळ्यात तो स्थलांतर करून हिमालय आणि आसाममध्ये येतो. विणीच्या काळात हा पक्षी गुलाबी दिसतो. हिवाळ्यात स्थलांतर करणारा "रोझी पिपिट' फेब्रुवारीत परत जातो. पुस्तके किंवा इंटरनेटवरही फारशी माहिती उपलब्ध नाही इतपत हा पक्षी दुर्मिळ आहे.

मिळाले मराठी नाव
हिमालय आणि आसामव्यतिरिक्त "रोझी पिपिट' देशभरात इतरत्र कुठेच आढळत नसल्याने त्याला आतापर्यंत मराठीत काय म्हणावे हा प्रश्‍नदेखील उद्‌भवला नव्हता. मात्र, अकोल्यात त्याचे वास्तव्य आढळल्यावर त्याला मराठीत नाव देण्याबाबत रवी धोंगळे यांनी राजू कसंबेंसोबत चर्चा केली. त्यांनी "गुलाबी तीरचिमणी' असे नाव सुचविले. लवकरच या नावाला औपचारिक दर्जा मिळणार आहे.

Web Title: rosy pipit in akola