'आरपीआय' सत्तेपासून दूरच - रामदास आठवले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

नागपूर - गेल्या लोकसभा निवडणुकीत "भीमशक्ती'मुळे भाजपला विजय मिळाला. रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते मात्र सत्तेतील वाट्यापासून दूरच राहिले, असे शल्य रिपब्लिकन नेते व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज व्यक्त केले.

नागपूर - गेल्या लोकसभा निवडणुकीत "भीमशक्ती'मुळे भाजपला विजय मिळाला. रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते मात्र सत्तेतील वाट्यापासून दूरच राहिले, असे शल्य रिपब्लिकन नेते व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज व्यक्त केले.

रिपब्लिकन नेते उमाकांत रामटेके यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आठवले आज सकाळी नागपुरात आले होते. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, 'रिपब्लिकन पक्षाने भाजप-शिवसेना आघाडीसोबत गेल्या लोकसभा निवडणुकीत आघाडी केली होती. या वेळी सत्तेत रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना 10 टक्के वाटा मिळेल, असे आश्‍वासन भाजपच्या नेत्यांनी दिले होते. केंद्रात भाजप सत्तेत आल्यानंतर राज्यातही भाजपची सत्ता आली. केंद्रातील सत्तेला आता चार वर्षे पूर्ण झाली आहेत. तसेच राज्यातील भाजपच्या सत्तेला साडेतीन वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. या काळात रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना सत्तेत सामावून घेण्याचे प्रयत्न झालेले नाहीत. राज्य मंत्रिमंडळात रिपब्लिकन पक्षाला वाटा, विधान परिषद तसेच महामंडळ-मंडळाच्या अध्यक्षांच्या निवडीतही रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांना अद्यापही संधी मिळालेली नाही.''

खोब्रागडे फाउंडेशन व्हावे
रिपब्लिकन नेते बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांचे स्मारक नागपुरात व्हावे, अशी मागणीही या वेळी आठवले यांनी केली. रिपब्लिकन नेते बॅ. खोब्रागडे यांचे नागपुरात स्मारक व्हावे, यासाठी रामटेके यांनी प्रयत्न केले होते. हीच मागणी रेटत आठवले यांनी रामटेके यांनी खोब्रागडे यांच्या स्मारकासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल त्यांची स्तुती केली.

Web Title: RPI Ramdas athawale politics