कोट्यावरून परतणाऱ्यांसाठी रेड कार्पेट, पुण्या, मुंबईतील विद्यार्थ्यांचे काय?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 April 2020

महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातून पुण्या-मुंबईला शिक्षण घेण्यासाठी गेलेले आणि लॉकाडाउनमुळे अडकलेल्या विद्यार्थ्यांचा वाली कोण, असा प्रश्‍न वंचित बहूजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी उपस्थित केला आहे.

 

अकोला :  राजस्थान कोटा येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील 1800 ते 2000 विद्यार्थ्यांना येत्या आठ दिवसात परत आणल्या जाईल व 3 मेपर्यंत त्यांना सुखरूप घरी पोहचविले जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या आदेशाने विद्यार्थ्यांना घरी सुखरूप पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मात्र महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातून पुण्या-मुंबईला शिक्षण घेण्यासाठी गेलेले आणि लॉकाडाउनमुळे अडकलेल्या विद्यार्थ्यांचा वाली कोण, असा प्रश्‍न वंचित बहूजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी उपस्थित केला आहे.

 

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने विदेशात अडकलेल्या विद्यार्थी व लोकांना विशेष विमानाने भारतातर आणले. शिवाय त्यांना त्यांच्या घरी पोहचविले. ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे. परंतु पुण्या-मुंबई सारख्या शहरात महाराष्ट्राच्या इतर भागातून आलेले व अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात मात्र सरकार उदासिन असल्याचे दिसते. वास्तविक महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातून गरीब विद्यार्थी विद्यार्थी पुणे व मुंबई येथे शिक्षण घेण्यासाठी येतात. आजही पुण्या-मुंबईमध्ये हजारो विद्यार्थी अडकलेले आहेत. तिकडे त्यांचे खाण्याच्या संदर्भात हाल सुरू आहेत. त्यांचे डबेवाले व कामवाले बंद झाले आहेत. सर्वच मुलांना स्वतः हाताने स्वयंपाक करणेसुद्धा जमत नाही. अशावेळी त्यांना उपाशी राहण्याशिवाय पर्याय नाही. हे सर्व विद्यार्थी गेल्या 22 मार्चपासून तिथेच अडकलेले आहेत. कोरोना संक्रमणापासून सुरक्षित आहेत. परंतु सध्याची परिस्थिती पाहता काही खाण्यापिण्याच्या वस्तूकरिता त्यांना बाहेर पडावे लागत असल्याने त्यांना कोरोना संसर्गाचा धोका कायम आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांद्वारा त्यांना त्यांच्या घरी नेण्याची व्यवस्था करण्यास हरकत नाही; परंतु शासनाला या गरीब विद्यार्थ्यांचा विसर पडल्याचे दिसून येते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना घरी आणण्यासाठीची परवानगी नाकारण्यात येत आहे. हा प्रकार त्या सर्व विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळण्यासारखा आहे. कोरोनाचा धोका कायम राहिल. त्यापेक्षा ते आपाआपल्या घरी सुरक्षित राहू शकतात. हवे तर त्या विद्यार्थ्यांचे स्क्रिनिंग करून त्यांना घरी जाण्यास परवानगी द्यावी. त्यांना घरी जाण्याची व्यवस्था त्यांचे पालक करण्यास तयार असताना सरकारने त्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आली आहे.

घरी सुखरुप राहतील
पुण्या-मुंबईतील सर्व विद्यार्थी कोरोना हॉटस्पॉट सारख्या भागातून बाहेरपडून त्यांच्या घरी सुखरुप राहतील व प्रशासनाचा देखील ताण कमी होईल. त्यामुळे सरकारने त्यांच्या घरी परतण्याची व्यवस्था करावी.
- डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, प्रदेश प्रवक्ते, वंचित बहुजन आघाडी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rred carpet, for those returning from the quota, What about the students on the Pune, Mumbai ?