उद्या संघाचा विजयादशमी उत्सव

छायाचित्र
छायाचित्र

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयदशमी उत्सव मंगळवारी रेशीमबाग मैदानावर सकाळी 7.40 वाजता प्रारंभ होणार आहे. एचसीएलचे संस्थापक, अध्यक्ष "पद्मविभूषण' शिव नाडर यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत राष्ट्राला संबोधित करतील.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विश्‍व संवाद केंद्राने प्रारंभ केलेल्या "निरंतर' या रेडिओ चॅनलवरून कार्यक्रम प्रसारित होणार आहे. दरवर्षीप्रमाणे फेसबुक, ट्‌विटर आणि वेबकास्ट माध्यमांवरही हा कार्यक्रम लोक मोठ्या प्रमाणात बघतील, असा अंदाज विश्‍लेषकांनी व्यक्‍त केला आहे.
गेल्या वर्षी सरसंघचालकांनी मोदी सरकारच्या कामावर समाधान व्यक्‍त करत, लोकसभा निवडणुकीत शत प्रतिशत मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आदेशाची स्वयंसेवकांनी काटेकोरपणे अंमलजावणी केली. परिणामी प्रचंड बहुमताने केंद्रात मोदी सरकार स्थापन झाले. महाराष्ट्रातील निवडणुका हा सध्या सर्वांत चर्चेचा विषय असला तरी, काश्‍मिरातील कलम 370 रद्द करण्याची संघाची जुनी मागणी मोदी सरकारने पूर्ण केली आहे. त्यामुळे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत पीओकेबाबतच्या संघाची भूमिका मांडतील का याकडे विश्‍लेषकांचे लक्ष राहणार आहे.

डॉ. हेडगेवार यांनी संघाची स्थापना विजयादशमीच्या मुहूर्तावर केली असल्याने हा स्थापनादिन साजरा होतो. मागील उत्सवाला नोबल पुरस्कार प्राप्त कैलाश सत्यार्थी प्रमुख अतिथी होते. यंदा एचसीएल कंपनीचे संस्थापक व अध्यक्ष शिव नाडर उपस्थित राहणार आहेत. एचसीएलने नागपुरातील मिहान प्रकल्पात मोठी गुंतवणूक केली असल्याने थेट संघाच्या व्यासपीठावर त्यांची उपस्थिती महत्त्वाची मानले जात आहे.

जगातील समीक्षक येणार
संघाबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांनी 70 देशातील-विदेशी पत्रकारांशी संवाद साधला. संघाने प्रथमच घेतलेल्या या पुढाकाराचे अनेकांनी स्वागत केले. त्यानंतर काही विदेशी पत्रकार व समीक्षकांनी विजयादशमी उत्सव प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा व्यक्‍त केली आहे. तेदेखील उपस्थित राहतील.

अरुणाचलातील बांधवांची उपस्थिती
"भारत मेरा घर' संकल्पनेअंतर्गत अरुणाचल प्रदेशातील 25 बंधू-भगिनी विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. विजयादशमी उत्सवात ही मंडळी उपस्थित राहणार असून, गालो, आदी, निशी, अशा 7-8 जनजातीचे ते प्रतिनिधी आहेत. विविध सामाजिक कार्य करणारे हे बांधव उच्च विद्या विभूषित आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com