संघाचा तृतीय वर्ष शिक्षा वर्ग सोमवारपासून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

. नागपूरला पहिला तृतीय वर्षाचा संघ शिक्षा वर्ग 1940 साली झाला. डॉ. हेडगेवारांच्या आयुष्यातील हा शेवटचा वर्ग होता. यंदा तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गात देशभरातून 1 हजार स्वयंसेवक आणि 150 शिक्षक-प्रबंधक सहभागी होणार आहेत

नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष शिक्षावर्गाला सोमवारपासून (ता. 15) रेशीमबागेतील स्मृतिमंदिर परिसरात प्रारंभ होणार आहे. 25 दिवस चालणाऱ्या या शिक्षावर्गासाठी देशभरातून संघ स्वयंसेवक येणार आहेत.

संघ स्वयंसेवकांसाठी होणाऱ्या शिक्षा वर्गाची तीन वर्षांत विभागणी केलेली आहे. प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्ष. हे वर्ग चोवीस दिवसांचे असतात आणि सामान्यत: उन्हाळ्याच्या सुटीत या वर्गांची रचना होते. तृतीय वर्ष नागपूरला होतो. अन्य उर्वरित वर्ग त्या-त्या प्रांतांत होतात. नागपूरला पहिला तृतीय वर्षाचा संघ शिक्षा वर्ग 1940 साली झाला. डॉ. हेडगेवारांच्या आयुष्यातील हा शेवटचा वर्ग होता. यंदा तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गात देशभरातून 1 हजार स्वयंसेवक आणि 150 शिक्षक-प्रबंधक सहभागी होणार आहेत. तृतीय वर्ष शिक्षा वर्गाला संघप्रणालीत महत्त्वाचे स्थान आहे.

साधारणत: चार वर्षांपूर्वीपर्यंत या वर्गात 1200 च्या आसपास स्वयंसेवकांची उपस्थिती राहायची. परंतु, आता या वर्गात निवड पद्धती सुरू झाली आहे. यंदा संघाच्या 41 प्रांतांमध्ये जिल्हा पातळीवर महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या तसेच तहसील पातळीवर दोन वर्षांहून अधिक काम केलेल्या संघ स्वयंसेवकांना या वर्गामध्ये संधी दिली आहे.

Web Title: RSS initiative in Nagpur