"आरएसएस'ला माझी भीती वाटते - प्रकाश आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

अकोला - हे सरकार सहा महिन्यांच्या वर राहणार नाही, असे मी मध्य प्रदेशमध्ये एका पत्रकार परिषदेत म्हणालो होतो. मात्र, आरएसएसने माझे ते वाक्‍य पंतप्रधान नरेंद्र मोदींना आलेल्या धमकीला जोडून एक व्हिडिओ व्हायरल केला. आरएसएससारख्या संघटनेकडून हीन दर्जाच्या प्रसिद्धीचा हा केविलवाणा प्रकार आहे. माझी सर्वांत जास्त भीती आरएसएसला आहे, असा टोला भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी (ता. 14) लगावला.

अकोला जिल्हा परिषदेत झालेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी केंद्र व राज्यातील सत्ताधारी भाजपवर तोफ डागली. आंबेडकर म्हणाले, एल्गार परिषदेतील सहभागावरून सरकारने पाच जणांना अटक केली.

या प्रकरणात एका पत्रात कॉम्रेड प्रकाश असा उल्लेख असल्याने तो कॉम्रेड प्रकाश म्हणजे मीच असल्याची अफवा इंग्रजी मीडियाने पसरविली. मुळात ते पत्र आम्ही जाहीर केले नाही आणि आमच्या ताब्यातही नाही, असे पोलिसांनी जाहीर केले. त्यामुळे त्याचा माझ्याशी संबंध नसताना मीडियाला हाताशी धरून आरएसएसवाले अफवा पसरवित आहेत. कोरेगाव भीमाची दंगल मावोवाद्यांनी कशी केली, असा बनाव दाखविण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश पी. बी. सावंत आणि उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश कोळसे पाटील यांनी एल्गार परिषदेचे आयोजक आम्हीच आहोत, त्या पाच जणांचा त्यात संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्य सरकार अडचणीत आले आहे.

संभाजी भिडेंचा पत्ता मी दाखवतो
माझ्या वाडीतील आंबे खाल्ल्याने मूल होते, असे वादग्रस्त विधान करणाऱ्या संभाजी भिडे यांना नोटीस बजावण्यासाठी त्यांचा पत्ता नाशिक महापालिका किंवा पोलिसांना सापडत नसेल; तर त्यांनी मला सांगावे, मी त्यांचा पत्ता दाखवितो. मी त्यांना तेथे घेऊन जातो.
- प्रकाश आंबेडकर, राष्ट्रीय अध्यक्ष, भारिप बहुजन महासंघ

Web Title: RSS prakash ambedkar