दुसरी सोडत आज; 2 हजार 771 जागांवर मिळणार प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

नागपूर - शिक्षणाचा अधिकार कायद्याअंतर्गत (आरटीई) देण्यात येत असलेल्या 25 टक्के प्रवेशाच्या सोडतीत 6 हजार 838 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले. यापैकी चार हजार सात विद्यार्थ्यांना आतापर्यंत शाळांमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. आता रिक्त असलेल्या 2 हजार 771 जागांसाठी उद्या गुरुवारी दुपारी तीन वाजता दुसरी सोडत काढण्यात येणार आहे.

नागपूर - शिक्षणाचा अधिकार कायद्याअंतर्गत (आरटीई) देण्यात येत असलेल्या 25 टक्के प्रवेशाच्या सोडतीत 6 हजार 838 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले. यापैकी चार हजार सात विद्यार्थ्यांना आतापर्यंत शाळांमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. आता रिक्त असलेल्या 2 हजार 771 जागांसाठी उद्या गुरुवारी दुपारी तीन वाजता दुसरी सोडत काढण्यात येणार आहे.

शहरात आरटीईच्या 7 हजार 99 जागांसाठी 23 हजार 486 पालकांनी अर्ज केले होते. आठ मार्चला लागलेल्या सोडतीत 6 हजार 838 विद्यार्थ्यांचा क्रमांक लागला. त्यांना दहा ते वीस मार्चदरम्यान शाळांमध्ये प्रवेश घ्यावयाचा होता. यावर्षी शिक्षण विभागाने भाड्याने राहणाऱ्या प्रत्येकच पालकाला दुय्यम निबंधक कार्यालयातून किमान दोन वर्षे किरायाने राहत असल्याचा करारनामा तयार करून आणण्यास सांगितले होते. शिवाय ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम फेरीत प्रवेश घेतला नाही, त्याला दुसऱ्या फेरीत बाद करण्यात येईल असेही स्पष्ट केले होते.

या अटींमुळे भाड्याने राहणाऱ्या बऱ्याच पालकांना करारनामा तयार करण्यात अडचण येत आहे. मात्र, शाळांनी हे प्रमाणपत्र असल्याशिवाय प्रवेश देण्यास नकार दिला. त्यातूनच कालपर्यंत 433 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले होते. मात्र, शेवटल्या दिवशी त्यात भर पडून दोन हजार 730 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्याची माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे अनेकांना करारनाम्यामुळे प्रवेशास मुकावे लागल्याची माहिती आहे.

त्यामुळे 20 मार्चला बऱ्याच कमी पालकांनी त्यांच्या पाल्यांचा प्रवेश करता आला. मात्र, त्यानंतर शाळांनी पालकांना मुभा दिल्यावर 29 तारखेपर्यंत तीन हजार 106 जागांवर प्रवेश देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही शहरातील झोपडपट्टीधारकांकडे तसे करारपत्र नसल्याने त्यांना मिळालेल्या पट्टेवाटपाच्या कागदावर प्रवेश देण्याची मागणी समोर आल्याने पहिल्या फेरीत प्रवेशास पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी ही पाच एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आता चार हजार सात जागांवर प्रवेश देण्यात आले असून उर्वरित जागांसाठी उद्या सोडत निघेल.

नव्यांना संधी
आरटीईच्या दुसऱ्या सोडतीत पहिल्या फेरीमध्ये क्रमांक लागलेल्या पालकांचा विचार केला जाणार नसल्याचे समजते. त्यामुळे दुसऱ्या सोडतीत संपूर्ण नव्या अर्जाचा विचार केला जाणार आहे. शिवाय ज्या पालकांनी प्रवेश घेतले नाही. त्यांनाही त्यातून बाद करण्यात आले आहे.

Web Title: rte admission