दोन हजारांवर जागा वाढणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

नागपूर विभागात दीड हजारांवर शाळा

नागपूर - राज्यात आरटीईच्या प्रवेशासाठी वेळापत्रकाची घोषणा नुकतीच करण्यात आली. त्यानुसार एक जानेवारीपासून राज्यातील शाळांची नोंदणी करण्यास सुरुवात होणार आहे. पंधरा दिवसांनंतर पालकांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. मात्र, याही वर्षी गतवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेशाच्या शहरात किमान पाचशेहून अधिक जागांमध्ये वाढ होण्याची शक्‍यता आहे. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत दोन हजारांवर जागांमध्ये वाढ होणार असल्याची शक्‍यता आहे. 

राज्यात २०११ पासून आरटीईची प्रक्रिया राज्यात राबविण्यात येत आहे. गेल्या पाच वर्षांत सातत्याने आरटीईच्या जागांमध्ये वाढ होताना दिसून येत आहेत. त्यानुसार शाळांच्याही संख्यांमध्ये वाढ होत आहे. शहराची आकडेवारी बघितल्यास २०१३-१४ मध्ये सहा हजार प्रवेश करण्यात आले होते. मात्र, २०१५-१६ मध्ये त्यात सहाशे विद्यार्थ्यांनी वाढ दिसून आली. गतवर्षीही जवळपास सहाशे विद्यार्थी वाढले होते.

त्यामुळे यावर्षीही शहरात जवळपास सहाशेहून अधिक विद्यार्थ्यांची वाढ दिसून येईल. केवळ विद्यार्थीच नव्हे तर दरवर्षी अर्ज करणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. गतवर्षी साडेतेरा हजारांवर पालकांनी अर्ज केले होते. त्यामुळे यावर्षी किमान तो आकडा शहरात पंधरा हजारांवर जाण्याची शक्‍यता आहे. शहराप्रमाणेच विभागातील गोंदिया, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात आरटीईबाबत जागरूकता वाढल्याने पालकांची अर्ज संख्या आणि शासनाकडून काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी होत असल्याने शाळांच्या संख्येत वाढ होणार असल्याचे दिसून येते. त्यामुळे दिवसेंदिवस आरटीईबद्दल नागरिकांमध्ये प्रचार होताना दिसून येत आहे. 

आरटीईच्या प्रचार आणि प्रसारासाठी शासनाकडून विशेषत: शिक्षण विभागाकडून दरवर्षी बरेच प्रयत्न केले जातात. त्याचाच परिणाम म्हणून दरवर्षी जागा आणि अर्ज करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. यावर्षीही ती वाढ निश्‍चित दिसून येईल.
- दीपेंद्र लोखंडे,  प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद

Web Title: rte admission seats increase