आरटीईच्या मुलांना मिळेना मोफत पुस्तके 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

आरटीई प्रवेश प्रक्रियेत शाळांमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी मोफत पुस्तके व गणवेशासपासून वंचित असल्याची माहिती समोर आली आहे. शैक्षणिक सुविधा मिळत नसल्याने पालकांमध्ये रोष असून, विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित होण्याचे वेळ आली आहे. 

नागपूर - आरटीई प्रवेश प्रक्रियेत शाळांमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी मोफत पुस्तके व गणवेशासपासून वंचित असल्याची माहिती समोर आली आहे. शैक्षणिक सुविधा मिळत नसल्याने पालकांमध्ये रोष असून, विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित होण्याचे वेळ आली आहे. 

दरवर्षी राज्यात आरटीईअंतर्गत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. नागपुरातील 663 शाळांमध्ये सात हजार 204 जागांचा समावेश होता. यासाठी फेब्रुवारी महिन्यापासून प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. मे महिन्यात पहिली सोडत काढली. यामध्ये पाच हजार 699 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी तीन हजार 904 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. यानंतर दीड महिन्याने दुसरी सोडत काढण्यात आली. त्यात निवडलेल्या विद्यार्थ्यांपैकी जवळपास एक हजार 573 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. यानंतर तिसऱ्या सोडतीत 491 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. मात्र, प्रवेश घेणाऱ्या बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दुय्यम दर्जाची वागणूक देण्यात येत असल्याचे दिसून येते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके व गणवेश देणे अनिवार्य असताना त्यांना यापासून वंचित ठेवण्यात येते. याउलट पालकांना सीबीएसई शाळांमध्ये महागडी पुस्तके खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याचे चित्र आहे. 

चौथी फेरी कधी? 
आरटीईच्या तीन फेऱ्यांमध्ये आतापर्यंत पाच हजार 968 विद्यार्थ्यांना प्रवेश दिले असून, शहरात एक हजार 236 जागा रिक्‍त आहेत. त्यामुळे या जागांच्या प्रवेशासाठी चौथ्या फेरीची वाट पालकांकडून बघण्यात येत आहे. लवकरात लवकर चौथी फेरी घेण्याची मागणी पालकांकडून होत आहे. 

विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके व गणवेश द्यावे, असे आदेश सरकारने काढले आहे. मात्र, ते अद्याप विद्यार्थ्यांना मिळालेले नाहीत. गरीब पालक महागडी पुस्तके व गणवेश कसा खरेदी करेल, हा प्रश्‍न आहे. याबाबत शिक्षण विभागही मूग गिळून बसल्याचे दिसत आहे. 
- शाहीद शरीफ,  अध्यक्ष, आरटीई ऍक्‍शन समिती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RTE children do not receive free books