RTE: तेराशे जागा रिक्त; तिसऱ्या फेरीत पालकांचा अत्यल्प प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

काही दिवसांपूर्वी तिसऱ्या फेरीत 1 हजार 316 विद्यार्थ्यांची निवड केली होती. मात्र, त्यापैकी केवळ 452 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. आतापर्यंत 5 हजार 701 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, त्यापैकी 1 हजार 398 जागा अद्याप रिक्त आहेत.

नागपूर : शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार (आरटीई) शहरात राबविण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेत तिसऱ्या फेरीनंतर जवळपास एक हजार 398 जागा रिक्त आहेत. ऑनलाइन नोंदणीत 23 हजारांवर अर्ज आल्यानंतरही इतक्‍या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्याने प्रशासनाच्या प्रयत्नावर प्रश्‍नचिन्ह निर्माण होताना दिसून येते.

राज्यात यंदा आरटीईच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले. राज्यभरातून बऱ्याच प्रमाणात अर्ज आले. नागपुरातून 7 हजार 99 जागांसाठी 23 हजार 461 अर्ज आले. त्यानुसार एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या पहिल्या फेरीत 4 हजार 11 अर्ज आले. दुसऱ्या फेरीत 1 हजार 238 प्रवेश देण्यात आले. काही दिवसांपूर्वी तिसऱ्या फेरीत 1 हजार 316 विद्यार्थ्यांची निवड केली होती. मात्र, त्यापैकी केवळ 452 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. आतापर्यंत 5 हजार 701 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, त्यापैकी 1 हजार 398 जागा अद्याप रिक्त आहेत. विशेष म्हणजे आरटीईच्या प्रसार आणि प्रचार जास्तीत जास्त करावा, यासाठी प्रत्येक वेळी प्राथमिक विभागाला सूचना दिल्या जातात; तरीही मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्याचे दिसून येते.

गतवर्षी विभागात पाच हजारांवर जागा रिक्त होत्या. त्यात नागपुरात सर्वाधिक जागा रिक्त होत्या. यंदा अर्जांची संख्या बघता ती संख्या कमी होईल, असे संकेत होते. मात्र, तिसऱ्या फेरीनंतर रिक्त जागा लक्षात घेता, गतवर्षीचीच परिस्थिती कायम असल्याचे चित्र आहे. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांना संपर्क केला असता, तो होऊ शकला नाही.

Web Title: RTE mission gets cold response