सोशल मीडियावर ‘आरटीई’चे वेळापत्रक झाले ‘व्हायरल’ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 जानेवारी 2019

नागपूर - शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार (आरटीई) दरवर्षी प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. मात्र, अद्याप या प्रक्रियेचे अधिकृत वेळापत्रक काढण्यात आले नसताना सोशल मीडियावर त्याचे खोटे वेळापत्रक ‘व्हायरल’ झाले असल्याने पालकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. या प्रकाराने प्राथमिक विभागाकडे पालकांकडून विचारणा होताना दिसत आहे. मात्र, प्रशासनाकडून असे कुठलेही वेळापत्रक आले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी विविध माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रत्येक शाळेत एकूण संख्येच्या २५ टक्के प्रवेश दिले जातात. यासाठी दरवर्षी स्वतंत्रपणे प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येते. साधारणत: जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात वा फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होते. यंदाच्या प्रवेशप्रक्रियेची वाट बघणे आता सुरू झाले असून, पालकांकडून शिक्षण विभागाकडे विचारणा करण्यात येते आहे. दरम्यान, सोशल मीडियावर आरटीई प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्याबाबतचे संदेश व्हायरल होत आहेत. या वेळापत्रकानुसार २० जानेवारीपासूनच आरटीईचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, २८ फेब्रुवारीपर्यंत पालकांना अर्ज भरता येतील, असे या संदेशांमध्ये नमूद करण्यात आले आहे. मात्र, शिक्षण विभागाकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. आरटीई प्रवेशांसाठी शिक्षण विभागाने विशेष संकेतस्थळ तयार केले आहे. प्रवेशाचे सर्व व्यवहार याच संकेतस्थळामार्फत करण्यात येतात. या संकेतस्थळावरही वेळापत्रकाची घोषणा करण्यात आलेली नाही. या शैक्षणिक सत्रातील आरटीई प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असे या संकेतस्थळावर दाखविण्यात येते आहे.

Web Title: RTI schedule on social media viral