परीक्षा संपल्यावर प्रवेशपत्र देणार काय?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

नागपूर - आयटी रिफॉर्मच्या नावावर विद्यार्थ्यांची दिशाभूल करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा दावा पुन्हा एकदा फोल ठरला आहे. मंगळवारपासून (ता. 29) परीक्षांचा चौथा टप्पा सुरू होणार असताना, अनेक अभ्याक्रमांच्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रच मिळाले नाही. त्यामुळे चांगलीच दमछाक होत आहे. शनिवार व रविवारी विद्यापीठाला सुटी असल्यामुळे प्रवेशपत्र परीक्षा संपल्यावर देणार काय, असा संतप्त सवाल विद्यार्थी आणि पालकांकडून विचारण्यात येत आहे.

विद्यापीठांच्या चौथ्या टप्प्यात एकूण 450 अभ्याक्रमांच्या परीक्षांचा समावेश आहे. इंजिनिअरिंग, बीए, एमए, एमएससीसह विविध अभ्याक्रमांच्या विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना देण्यात आलेले नाही. प्रवेशपत्रासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनाकडे विचारणा केली असता, विद्यापीठाकडूनच देण्यात आले नसल्याचे उत्तर मिळत आहे. यात शनिवार व रविवार सुटी तसेच नोटाबंदी विरोधात सोमवारी भारत बंदची हाक देण्यात आल्याने प्रवेशपत्राच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यापीठाचा सावळा गोंधळ विद्यार्थ्यांसाठी नवा नाही. मात्र, दरवर्षी परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना तोकड्या पडतात. दुसरीकडे महाविद्यालयांनी केलेल्या चुकांचा फटका विद्यापीठाला बसत आहे. त्यामुळे विद्यापीठ दोन्ही बाजूने अडचणीत येत आहे.

मागील वर्षीपासून विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने ऑनलाइन प्रक्रियेचा स्वीकार केला. त्यामुळे परीक्षा प्रक्रिया आतातरी सुलभ होणार, अशी आशा निर्माण झाली होती. परंतु, मूल्यांकन प्रक्रियावगळता सगळीकडे गोंधळच गोंधळ दिसून येत आहे.

चुकीच्या प्रवेशपत्राचे काय करणार?
यावेळेस योग्य नियोजन करण्यात आले असून, सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडतील, असा दावा विद्यापीठ प्रशासनाकडून दरवर्षी करण्यात येतो. मात्र, ढिसाळ नियोजनामुळे या सर्व दाव्यांची हवा निघून जात असल्याचे चित्र आहे. एकीकडे प्रवेशपत्रासाठी धावाधाव सुरू असताना दुसरीकडे काही अभ्याक्रमांचे प्रवेशपत्र चुकीचे असल्याने विद्यार्थ्यांच्या अडचणींमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. याबाबत प्रशासनाकडे विचारणा केली असता, एकमेकांकडे बोट दाखविण्याचा प्रकार सुरू आहे. मात्र, अडचण कशी सोडविल्या जाणार, याबाबत कुणी फारसे गंभीर नाही.

Web Title: RTM university