अफवांच्या ‘पावसाने’ सरकारची तारांबळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

नागपूर - मुख्यमंत्र्यांच्या शहरात गुन्ह्यांचा वाढलेला ग्राफ, धुळ्यात जमावाने सामूहिक हल्ला करून पाच जणांचे घतलेले बळी, नाणार प्रकल्प, कर्जमाफीतील घोळ आणि खरिपाचे कर्ज वाटप करताना बॅंका टाळाटाळ करीत असल्याने बुधवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात सरकारची कसोटी लागणार आहे.

नागपूर - मुख्यमंत्र्यांच्या शहरात गुन्ह्यांचा वाढलेला ग्राफ, धुळ्यात जमावाने सामूहिक हल्ला करून पाच जणांचे घतलेले बळी, नाणार प्रकल्प, कर्जमाफीतील घोळ आणि खरिपाचे कर्ज वाटप करताना बॅंका टाळाटाळ करीत असल्याने बुधवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात सरकारची कसोटी लागणार आहे.

विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकून इरादे स्पष्ट केले आहे. अधिवेशनाच्या दोन दिवस आधी सिडकोचा घोटाळा बाहेर काढून विरोधकांनी सरकारची पुरती कोंडी केली आहे. मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेतील राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी सरकारच्या चार वर्षांतील अपयशाचा पाढा वाचला.

हिवाळी अधिवेशनात बोंडअळीला जाहीर केलेली मदत दिली नाही, कर्जमाफीतील घोळा अद्याप निस्तारलेला नाही, नव्याने कार्ज देण्यात राष्ट्रीय बॅंका टाळाळ करीत आहेत, दुसरीकडे कोकणातील जनतेला विश्‍वासात घेऊनच नाणार प्रकल्प उभा केला जाईल असे सांगताना विविध करार केले जात असल्याने विरोधकांना त्यांच्या विरोधात आयते कोलीत मिळाले आहे.  देशाला कुठलाच फायदा होत नसल्याने इंडोनेशियाने फेटाळलेला प्रकल्प नाणारमध्ये आणल्याचा त्यांचा आरोप आहे. प्लॅस्टिकबंदीचा पुरता फार्स झाला आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे गृह खात्याची जबाबदारी असल्याने मुख्यमंत्र्यांनाच टार्गेट केले जाणार आहे.

आरोप-प्रत्यारोपांच्या सरबत्ती
विरोधक अफवा पसरवतात. आरोप करणे त्यांचे कामच आहे असे सांगून  मुख्यमंत्र्यांनी राजकीय अफवांना राजकीयच उत्तर देऊ असे सांगून विरोधकांनाच यात गुंतवण्याची तयारी केली आहे. सिडको जमीन घोटाळ्यातील कंत्राटदार भतिजा याचा मागील सरकारमध्ये चाचा कोण होता हे सभागृहात उघड करू असा इशारा देऊन त्यांनी विरोधकांना आधीच गारद केले आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशन आरोप-प्रत्यारोपांच्या सरबत्तीने चांगलेच गाजणार असल्याचे दिसून येते.

विधानभवनावर धडकणार दोन मोर्चे
विविध मागण्यासाठी बुधवारी दोन मोर्चे विधानभवनावर धडकणार आहेत. संविधान सुरक्षा सेना आणि महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनांच्या मोर्चाची धडक विधानभवनावर असणार आहे. धीरज जयदेव गजभीये, ब्रम्हानंद वैद्य आणि सचिन उके यांच्या नेतृत्वात वेगळा विदर्भाच्या मागणीसाठी शेकडा तरूण यशवंत स्टेडीयम जवळून विधानभवनाकडे निघणार आहेत. त्यांना मॉरेस कॉलेज टी पॉईंटवर थांबविण्यात येईल. वेगळा विदर्भासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे. कोतवाल संघटना संजय धरम, प्रवीण कर्डक, दिलीप सावळे यांच्या मार्गदर्शनात १५०० कोतवाल मोर्चा काढणार. त्यांना टेकडी रोडवर थांबविण्यात येणार आहे.

Web Title: rumor government Rainy Session