अफवा, चर्चा अन्‌ जोश ; "इलेक्‍शन फिव्हर ' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

अमरावती:  या भागात अमुक उमेदवाराचे व्होटिंग जोरात सुरू आहे, तर तिथे त्याची हवा आहे. आपलाच उमेदवार निवडून येणार, अशा प्रकारच्या चर्चा अफवांनी सोमवारचा दिवस गाजला. विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्यावेळी कार्यकर्त्यांचा जोश पाहण्यासारखा होता. मतदारांना मतदानकेंद्रापर्यत आणण्याची अनेक केंद्रांवर पराकाष्ठा करण्यात आली.

अमरावती:  या भागात अमुक उमेदवाराचे व्होटिंग जोरात सुरू आहे, तर तिथे त्याची हवा आहे. आपलाच उमेदवार निवडून येणार, अशा प्रकारच्या चर्चा अफवांनी सोमवारचा दिवस गाजला. विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्यावेळी कार्यकर्त्यांचा जोश पाहण्यासारखा होता. मतदारांना मतदानकेंद्रापर्यत आणण्याची अनेक केंद्रांवर पराकाष्ठा करण्यात आली.
सोमवारी विधानसभा मतदारसंघाच्या मतदानाला सकाळी सातपासून सुरवात झाली. सुरवातीला अतिशय संथपणे मतदान झाले. मतदान केंद्रांवर तुरळक मतदार दिसत होते, मात्र काही वेळाने मतदानकेंद्रांवरील गर्दी वाढू लागली. यंदा जवळपास सर्वच मतदारसंघांमध्ये "कांटे की टक्कर' असल्याने प्रतिस्पर्धी कार्यकर्त्यांमध्ये जणू स्पर्धाच लागली होती. ज्येष्ठ नागरिकांमध्येसुद्धा मतदानाचा उत्साह दिसून येत होता. अमुक एका भागात आपल्याच उमेदवाराचा जोर आहे, अशा प्रकारची चर्चा मतदान संपेपर्यंत सुरू होती. विशेष म्हणजे अनेकांनी झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवरून "निकाल' लावण्याचासुद्धा प्रयत्न केला. मतदानसंपेपर्यंत उमेदवारांच्या जय पराजयाचे गणित मांडणे सुरूच होते. शहरातील राजकीय दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या अंबागेट, भाजीबाजार, रुक्‍मिणीनगर, रविनगर, छांगाणीनगर, गाडगेनगर, राधानगर, शेगाव नाका आदी भागांवर उमेदवार तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांचे विशेष लक्ष होते. त्यामुळे या भागातील मतदानकेंद्रांवर मतदारांची संख्यासुद्धा अधिक असल्याचे दिसून आले.

मतदान केंद्रांवर नमस्कार
अनेक मतदान केंद्रांवर उमेदवारांचे कार्यकर्ते आपल्या परिचितांना हात जोडून आपल्याच उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन करीत होते. तर काहींनी मतदारांना स्वतःच्या वाहनातून आणून सोडल्याची चर्चा होती. 

बच्चे कंपनीची बल्लेबल्ले 
मतदानामुळे शाळांना सुटी जाहीर करण्यात आली. त्यामुळे सोमवारी मतदानाचा दिवस बच्चे कंपनीसाठी "एन्जॉयफूल' ठरला. शिक्षक मतदानासाठी बाहेरगावी गेल्याने काही शाळा मंगळवारी (ता.22) सुद्धा बंद राहण्याची शक्‍यता आहे. 
 
70 ठिकाणी बदलले व्हीव्हीपॅट
जिल्ह्यातील विधानसभेच्या आठही मतदारसंघात सोमवारी (ता.21) सकाळी 7 वाजता मतदान सुरू झाल्यानंतर ईव्हीएमच्या कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट तसेच व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड झाल्याचे प्रकार निदर्शनास आले. 
जिल्हाभरात 70 ठिकाणचे व्हीव्हीपॅट, 13 ठिकाणी कंट्रोल युनिट, तर 19 ठिकाणी बॅलेट युनिट बदलण्यात आले. मतदान यंत्रातील बिघाडाचे हे प्रकार प्रत्येक मतदारसंघात एक-दोन मतदान केंद्रावर घडले. धामणगावरेल्वे, अमरावती व बडनेरा मतदारसंघात प्रत्येक केंद्रावर एक व्हीव्हीपॅट, एक कंट्रोल युनिट व दोन बॅलेट युनिट, तर उर्वरित सर्वच ठिकाणी कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट व व्हीव्हीपॅटचा प्रत्येकी एक संच लावण्यात आला होता. 

सुरक्षा कर्मचारी ताटकळत
निवडणुकीदरम्यान शहरी भागात मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी तसेच सुरक्षा कर्मचाऱ्यांची दुपारी 3.30 वाजेपर्यंत भोजनाची व्यवस्था नव्हती. निवडणुकीसाठी बाह्य राज्यातील कर्मचारी तैनात होते, केंद्रालगतचे हॉटेल, कॅन्टीन बंद असल्याने त्यांना ताटकळत राहावे लागले.

पर्यावरणपूरक कागदावरच
ही निवडणूक पर्यावरणपूरक करण्याचे निवडणूक आयोगाने ठरविले होते. मतदानकेंद्रात सामग्रीसाठी प्लॅस्टिकचा वापर टाळण्याच्या सूचना होत्या. मात्र काही मतदान केंद्रांवर प्लॅस्टिकमधून जेवण पोहोचविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rumors, talk and enthusiasm; "Election Fever"