esakal | ग्रामसेवक संपावर गेल्याने ग्रामीण विकासाचे रेकॉर्ड कुलूपबंद
sakal

बोलून बातमी शोधा

एटापल्ली : गटविकास अधिकाऱ्यांना चाव्या व निवेदन देताना ग्रामसेवक युनियनचे पदाधिकारी.

ग्रामसेवक संपावर गेल्याने ग्रामीण विकासाचे रेकॉर्ड कुलूपबंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

एटापल्ली (गडचिरोली) : आपल्या विविध मागण्यांसाठी ग्रामसेवकांनी संपाचे हत्यार उपसले असून ग्रामपंचायतींना टाळे लावत त्याच्या चाव्या गटविकास अधिकाऱ्यांना सोपविल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण विकासाचे रेकॉर्ड आता कुलूपबंद झाले आहेत.
एटापल्ली तालुक्‍यातील ग्रामसेवकांनी शासन दरबारी विविध समस्यांच्या मागण्या पुढे करून कामबंद आंदोलन सुरू केले असून ग्रामपंचायतींना टाळे मारून चाव्या गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण विकासाचे रेकॉर्ड कुलूपबंद झाले आहे.
एटापल्ली तालुक्‍याच्या संपूर्ण ग्रामपंचायती मागास, अतिदुर्गम व नक्षल प्रभावी क्षेत्रातील असून विकासाचा एकमेव केंद्रबिंदू ग्रामपंचायत हाच आहे. मात्र, ग्रामसेवकांनी पाचव्या वेतन आयोगाची वेतन त्रुटी दूर करणे व इतर प्रलंबित न्याय हक्क मागण्यांसाठी असहकार आंदोलन सुरू केले आहे.
या मागण्या पूर्ण होईपर्यंत कोणतेही कार्यालयीन कामकाज न करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे तालुकाध्यक्ष शरद लोंढे, प्रदीप गेडाम, नीलकंठ धानोरकर, अनिल राऊत, दिवाकर झाडे, मनोज गेडाम, दयाराम श्रीरामे, ज्योतिराणी बन्देला, जयश्री कुळसंगे, सुषमा उईके, राजेश बाटवे, राजू शेंडे, लोमेश वाळके, विजय नारा, बंडू चौधरी, सुनील नन्नावरे, सत्यनारायण बड़गू व संजय येरमे आदी ग्रामसेवकांनी घेतला आहे. त्यामुळे ऐन शेती हंगामात शेतकऱ्यांना शेती उपयोगी अवजारे व इतर शासकीय योजना घेण्यास लागणारे दाखले, विद्यार्थ्यांचे शालेय प्रवेश व शिष्यवृत्तीकरिता लागणारे विविध दाखले, तसेच नागरिकांना घरकुल, शौचालय, नाली व गावस्वच्छता, पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण, अशा विविध कामकाजावर ग्रामसेवकांच्या असहकार आंदोलनाचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
सर्वत्र आंदोलन
ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सर्वत्र आंदोलन पुकारण्यात आले आहे. 9 ऑगस्ट 2019 पासून असहकार आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाचा शेवटचा टप्पा म्हणून गुरुवारी जिल्हाभरातील ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयीन कपाटाच्या चाव्या व सचिव शिक्‍के संबंधित गटविकास अधिकाऱ्यांकडे सोपवून कामबंद आंदोलनात सहभाग घेतला आहे. धानोरा येथे गटविकास अधिकाऱ्यांकडे चाव्या व शिक्‍के सोपवून ग्रामसेवकांनी आंदोलन सहभाग घेतला आहे.

loading image
go to top