सोनिया गांधी यांनी दिला सबुरीचा सल्ला 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

नितीन राऊत यांनी बुधवारी दिल्ली येथे सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यांना महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींची माहिती दिली. तडकाफडकी निर्णय घेण्याऐवजी आपली विचारधारा लक्षात घेऊन निर्णय घेऊ असा सल्लाही त्यांनी दिल्याने कॉंग्रेसही प्रसंगी तडजोड करू शकते अशी शक्‍यता निर्माण झाली आहे. 

नागपूर ः महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी शिवसेनेने पाठिंबा मागितल्यास काय करायचे या प्रश्‍नावर कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सबुरीचा सल्ला दिल्याचे उत्तर नागपूरचे आमदार नितीन राऊत यांनी सांगितले. तडकाफडकी निर्णय घेण्याऐवजी आपली विचारधारा लक्षात घेऊन निर्णय घेऊ असा सल्लाही त्यांनी दिल्याने कॉंग्रेसही प्रसंगी तडजोड करू शकते अशी शक्‍यता निर्माण झाली आहे. 
नितीन राऊत यांनी बुधवारी दिल्ली येथे सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यांना महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींची माहिती दिली. सध्या मुख्यमंत्रिपदासाठी भाजप आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली आहे. सेनेचा मुख्यमंत्रिपद आणि "फिफ्टी-फिफ्टी'चा आग्रह कायम आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिलेल्या आश्‍वासनाची पूर्ती करावी असे त्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याचा कुठलाच शब्द दिला नसल्याचे जाहीर करून खळबळ उडवून दिली आहे. त्यावरून युतीचे संबंध आणखीच ताणले आहेत. शिवसेनेचे नेते आपल्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत असे सांगून भाजपला इशारा देत आहेत. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या पाठिंब्यासाठी चाचपणी करीत आहेत. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेला सत्ता स्थापन करण्याची ऑफर दिली आहे. या सर्व घडामोडी राऊत यांनी सोनिया गांधी यांच्या कानावर टाकल्या. 
त्यावर सोनिया यांनी घाई करू नका योग्यवेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. कॉंग्रेस आणि शिवसेनेची विचारधारा वेगळी आहे. पाठिंबा देण्यापूर्वी किंवा सत्तेत सहभागी होण्यापूर्वी या सर्व बाबी तपासल्या जातील. पक्षाचे कुठलेच नुकसान होऊ नये याचीही खबरदारी घेतली जाईल. अद्याप अधिकृतपणे शिवसेनेने पाठिंबा मागितला नाही. त्यामुळे घाई करण्यात अर्थ नाही. त्यांचा प्रस्ताव आल्यावर पुढे जाता येईल, असेही सोनिया गांधी यांनी स्पष्ट केल्याचे नितीन राऊत यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. शिवसेनेचा प्रस्ताव आल्यास कॉंग्रेसमध्ये मतभिन्नता आहे. कॉंग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे. केवळ तात्पुरत्या लाभासाठी सत्तेत सहभागी होऊ नये. याचे भविष्यात पक्षावर विपरीत परिणाम होऊ शकतात, असे काहींचे म्हणणे असल्याचे कळते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saburi advised by Sonia Gandhi