सचिन, स्वप्नीलची "मेट्रो'त विद्यार्थ्यांसोबत धमाल 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

नागपूर - मराठीतील स्टार सचिन आणि स्वप्नील जोशी यांना एरवी दिवाणखान्यात टीव्हीवर बघून आनंद व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज चक्क त्यांच्यासोबत धमाल केली. मेट्रो रेल्वेतून प्रवास करताना स्टार कलावंतांसोबत धमाल करण्याची संधी मिळाल्याने या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची भरती दिसून आलीच शिवाय त्यांच्या आयुष्यातील संस्मरणीय क्षण ठरला. 

नागपूर - मराठीतील स्टार सचिन आणि स्वप्नील जोशी यांना एरवी दिवाणखान्यात टीव्हीवर बघून आनंद व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज चक्क त्यांच्यासोबत धमाल केली. मेट्रो रेल्वेतून प्रवास करताना स्टार कलावंतांसोबत धमाल करण्याची संधी मिळाल्याने या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची भरती दिसून आलीच शिवाय त्यांच्या आयुष्यातील संस्मरणीय क्षण ठरला. 

मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या तपासणीनंतर महामेट्रोने आज एअरपोर्ट साऊथ ते खापरी स्टेशनपर्यंत "प्री लॉंच जॉय राइड'चे आयोजन केले होते. अभिनेता सचिन, स्वप्नील जोशी, अभिनेत्री प्रणाली घोगरेने तासभर विलंब केल्यानंतरही "प्री लॉंच जॉय राइड'साठी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक उत्साही होते. सायंकाळी साडेपाचला अभिनेते, अभिनेत्री एअरपोर्ट साउथ स्टेशनवर पोहोचले. त्यानंतर मेट्रोच्या प्रवासात स्वप्नीलने कर्णबधिर विद्यालयातील मुले, नागलवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची मनेच जिंकली. स्वप्नीलने या मुलांसोबत सेल्फी घेतला. एवढेच नव्हे, तर मेट्रोचा प्रवास "फेसबुक लाइव्ह' करीत नागपूरकरांना पर्यावरणासाठी मेट्रोतून प्रवासाचे आवाहनही केले. अभिनेत्री प्रणाली घोगरेनेही विमलाश्रम, मातृसेवा संघातर्फे चालवल्या जाणाऱ्या वृद्धाश्रमातील महिलांशी हितगुज केले. 5 किमी अंतराच्या 8 मिनिटांच्या प्रवासात स्वप्नील व प्रणालीने मेट्रोतील सहप्रवाशांची मने जिंकली. स्वप्नील, सचिन, प्रणालीने विद्यार्थी तसेच ज्येष्ठ महिलांसोबत सेल्फीही घेतल्या. काही मिनिटांचा हा प्रवास गरीब मुलांसाठी आनंददायी ठरला. यावेळी मेट्रो रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कोकाटे यांच्यासह मेट्रोतील अधिकारी उपस्थित होते. 

मेट्रोतून प्रथमच प्रवास केला. मेट्रो ही नागपूरकरांसाठी वरदान ठरणार असून प्रत्येकानेच खासगी वाहनांऐवजी भविष्यात मेट्रोतून प्रवास केल्यास पर्यावरणासोबतच पैशाचीही बचत होणार आहे. चिमुकले विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांसोबत प्रवासाचा अनुभव अफलातून होता. 
-सचिन, अभिनेता. 

देशातील मोठ्या शहरांपैकी नागपूर एक असून, मेट्रो रेल्वेची गरज होती. अल्पावधितच नागपूरकरांना मेट्रोतून प्रवास करायला मिळणार आहे. देशातील वेगाने पूर्णत्वाकडे जाणारा हा प्रकल्प आहे. या प्रवासाचा आनंददायी प्रवास कायम स्मरणात राहील. 
-स्वप्नील जोशी, अभिनेता. 

Web Title: Sachin Swapnil in Metro with students