सचिन नागपूरकर मित्रासाठी म्हणतो, ये दोस्ती हम नहीं तोडेंगे

सचिन तेंडुलकरसोबत नरेश वाघमोडे.
सचिन तेंडुलकरसोबत नरेश वाघमोडे.

नागपूर : माणूस पदाने, सन्मानाने मोठा झाला की, जवळचे मित्र व नातेवाइकांना विसरून जातो. पण, महान फलंदाज सचिन तेंडुलकर या गोष्टीला अपवाद ठरला. यशाचे शिखर गाठूनही सचिन आपल्या नागपूरकर मित्राला कधीच विसरला नाही. तीन दशकांपेक्षा अधिक काळ लोटूनही सचिनने नरेश वाघमोडेसोबतची मैत्री जपली आहे.


सचिन आणि नरेश यांचे नाते अगदी कृष्णा व सुदामासारखे आहे. 1987-88 मध्ये सुरू झालेली मैत्री आजतागायत कायम आहे. ज्युनिअर आंतरविभागीय स्पर्धेच्या निमित्ताने सचिन त्यावेळी प्रथमच नागपुरात आला होता. त्यावेळेस दोघांची व्हीसीए सिव्हिल लाइन्सवर पहिल्यांदा भेट झाली. मुंबई ज्युनिअर संघाचा कर्णधार असलेल्या सचिनला चेंडू देणे, "बॉलिंग' करणे व "नॉकिंग'ला मदत करणे, इत्यादी कामे नरेश करायचा. इतकेच नव्हे, तर सचिन मुक्‍कामाला असलेल्या आमदार निवासातही नरेश नियमित जायचा. सचिनला जेवणासाठी सायकलवरून 160 गाळ्यांच्या खोलीपर्यंत नेण्यापासून तर, आमदार निवासातील कंपाउंड परिसरात फेरफटका मारण्यापर्यंत सचिनची प्रत्येक हौस नरेशने भागविली.

सचिन त्यानंतर अनेक वेळा नागपुरात आला. पण, तो कधीही आपल्या बालपणीच्या मित्राला विसरला नाही. 33 वर्षांपूर्वीची मैत्री त्याने आजही तेवढ्याच प्रामाणिकपणे जपली आहे. मधल्या काळात नोकरी व कामाच्या व्यापामुळे नरेशचे व्हीसीएवर जाणे बंद झाले. एकेदिवशी नरेश न दिसल्याने सचिनने त्याच्याबद्दल चौकशी केली आणि व्हीसीएवर बोलावून घेतले. नरेश आतापर्यंत अनेकदा सचिनच्या मुंबई येथील घरी गेला आहे. सचिनच्या बांद्रा येथील "साहित्य सहवासात' तो तब्बल दीड वर्षे राहिला. शिवाय सचिनचे लग्न, वडिलांचे निधन व नवीन बंगल्यामध्ये सामान "शिफ्टिंग'च्या वेळीदेखील तो 15 दिवस तेंडुलकर परिवारात मुक्कामी होता.

सचिननेही एकवेळा नरेशच्या गोपालनगरातील किरायाच्या घरी भेट दिली होती. उल्लेखनीय म्हणजे नरेशच्या लग्नानंतर सचिनने दोघांनाही मुंबईला बोलावून त्यांचे आदरातिथ्य केले होते. स्वत: सचिनच्या आईने स्वयंपाक केला आणि जाण्यापूर्वी नरेशची पत्नी मीनाला साडीचोळीही दिल्याची आठवण नरेशने सांगितली. याशिवाय वानखेडे स्टेडियमवर सचिनच्या निवृत्तीच्या ऐतिहासिक क्षणाचाही नरेश साक्षीदार राहिला आहे. निरोपाच्या सामन्यासाठी सचिनने त्याला खास निमंत्रण दिले होते. सामन्यानंतर अंजलीने आयोजित केलेल्या पार्टीलाही नरेश आवर्जून उपस्थित होता. दोन महिन्यांपूर्वी सचिन सहपरिवार ताडोब्याला गेला, तेव्हादेखील नरेश सोबत होता.

47 वर्षीय सचिन खाण्यापिण्याचा खूपच शौकिन आहे. व्हीसीएवर आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी आला की, तो नरेशकडून किंवा प्रशांत वैद्य यांच्याकडून वांग्याचं भरीत, उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा, फोडणीचं वरण इत्यादी अस्सल वैदर्भी पदार्थ हॉटेलमध्ये मागवायचा. नरेशनेही आपल्या मित्राची प्रत्येक हौस भागविली. गणपती व साईचा भक्‍त असलेला सचिन गजानन महाराजांनाही खूप मानतो. त्याची आईही रोज महाराजांची नियमित पोथी वाचते. काही वर्षांपूर्वी अंबाझरी परिसरातील गजानन महाराजांच्या मंदिरातही तो जाऊन आला होता.

फोनवरून देणार सचिनला शुभेच्छा
नरेश वाघमोडे सचिनचा वाढदिवस (24 एप्रिल) कधीच विसरत नाही. या दिवशी तो सचिनला हमखास फोन करून शुभेच्छा देत असतो. यावेळीदेखील फोनवरून आपल्या मित्राला शुभेच्छा देणार असल्याचे त्याने सांगितले. कोरोनामुळे सचिन 47 वा वाढदिवस साजरा करणार नसल्याची माहिती आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com