'सुरक्षित शालेय वाहतुकीसंदर्भात नियमावली '

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

नागपूर - शालेय वाहतूक अधिक सुरक्षित होण्याच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शाळा, व्यवस्थापन आणि वाहतूकदार यांच्यासाठी नवीन नियमावली लवकरच तयार होत असल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज विधान परिषदेत सांगितले.

नागपूर - शालेय वाहतूक अधिक सुरक्षित होण्याच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शाळा, व्यवस्थापन आणि वाहतूकदार यांच्यासाठी नवीन नियमावली लवकरच तयार होत असल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज विधान परिषदेत सांगितले.

सदस्य अनिल भोसले यांनी पुणे शहरातील शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित नसल्याबाबत तसेच अनेक बस विनापरवाना सुरू असल्याबाबतचा प्रश्‍न विचारला होता. या वेळी रावते म्हणाले की, शालेय मुलांची सुरक्षित वाहतूक करण्याच्या दृष्टीने प्रत्येक वाहनात केअर टेकरची नियुक्ती करणे, सीसीटीव्ही बसविणे, पंधरा वर्षे वापरात असलेले वाहन बंद करणे अशा अनेक तरतुदी करण्याच्या दृष्टीने शालेय सचिव आणि परिवहन सचिव यांची एकत्र बैठक घेण्यात येणार असून, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. या चर्चेत सदस्य शरद रणपिसे, जयंत पाटील यांनी भाग घेतला. 

तोटा कमी करण्यासाठी कृती आराखडा 
राज्य परिवहन महामंडळाच्या पालघर विभागात तोटा कमी करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आल्याचे परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य भाई गिरकर यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या पालघर विभागाची आर्थिक स्थिती सुधारण्याबाबतचा प्रश्‍न विचारला होता. या वेळी देशमुख म्हणाले की, पालघर विभागाला 2.85 लाखांचा तोटा झाला आहे. हा परिसर डोंगराळ असल्याने एसटी वाहतुकीचा देखभाल खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो. यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या चर्चेत सदस्य आनंद ठाकूर, भाई जगताप, प्रवीण दरेकर आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाग घेतला. 

पंढरपुरातील रस्त्यांची दुरुस्ती लवकरच 
पंढरपूर शहर व उपनगरातील रस्त्यांची कामे त्वरित दुरुस्त करण्यात येतील, असे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य रामहरी रुपनवर यांनी रस्त्यांच्या दुरवस्थेसंदर्भात प्रश्‍न विचारला होता. पोटे-पाटील म्हणाले की, या परिसरातील रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात वाळू आणि ऊस वाहून नेणाऱ्या जड वाहनांची वाहतूक असल्याने रस्ते मोठ्या प्रमाणात नादुरुस्त झालेले आहेत. रस्त्यांच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी ही कामे शासनाच्या विविध योजनांमधून हाती घेण्याचे नियोजन केले आहे. 

पास सवलत योजना बंद नाही : विजय देशमुख 
राज्य परिवहन महामंडळातील सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी व अधिकारी यांना देण्यात आलेली मोफत पास सवलत योजना बंद करण्यात आलेली नाही, असे परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख यांनी विधान परिषदेत सांगितले. भाजपच्या स्मिता वाघ यांनी परिवहन महामंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत पास देण्याबाबतचा प्रश्‍न विचारला होता. या चर्चेत सदस्य हेमंत टकले यांनी भाग घेतला. 

कणकवली-आचरा रस्त्याची दुरुस्ती करणार 
कणकवली-आचरा राज्य महामार्गावरील रस्त्याची दुरुस्ती त्वरित करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले. 
सदस्य भाई जगताप यांनी कणकवली-आचरा राज्य महामार्गाच्या झालेल्या दुरवस्थेबाबत प्रश्‍न उपस्थित केला होता. पोटे-पाटील पुढे म्हणाले की, रस्त्याच्या क्षतिग्रस्त लांबीतील मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम प्राधान्याने हाती घेण्याचे नियोजन आहे. 

पुणे जिल्ह्यात दूध संकलनात वाढ 
पुणे जिल्ह्यातील सहकारी दूध व्यवसायात 2016 मध्ये एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत रुपये 29.252 लाख लिटर एवढे दूध संकलन करण्यात आले असून, 2016 या कालावधीत दूध संकलनात वाढ झाली आहे, असे पदुम राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी विधान परिषदेत सांगितले. पुणे जिल्ह्यात दूध उत्पादनात झालेल्या घटबाबत आमदार अनंत गाडगीळ यांनी प्रश्‍न विचारला. या वेळी खोतकर म्हणाले की, पुणे जिल्ह्यासह राज्यातील दुग्ध उत्पादनवाढीस प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने प्रत्येक गावात बल्क मिल्क कुलर उपलब्ध करून देण्याकरिता दुग्ध विकास खात्यामार्फत सर्वेक्षण मोहीम सुरू करण्यात येत आहे. 

Web Title: Safe school transport