टाळ- मृदंगाच्या गजरात या दर्ग्यावर फडकली भगवी पताका; चारशे वर्षांची परंपरा

shirpur jain
shirpur jain

शिरपूर (जैन) (जि.वाशीम) : सध्याच्या काळात एकमेकांच्या धर्माचा आदर हरवत चालल्याचे दिसून येते. मात्र, याबाबत गेल्या 400 वर्षांपासून शिरपूरवासी आपल्या धार्मिक एकात्मतेच्या कृतीतून सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडवीत आहेत. शनिवारी (ता.22) येथील जानगीर महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याची पालखी परंपरेनुसार येथील मिर्झा मिया यांच्या दर्ग्यावर विसावली. यावेळी मौलवींनी पालखीची पूजा करून भगवी पताका दर्ग्यावर लावली. राष्ट्रीय एकात्मतेच्या या सोहळ्याला हजारो भाविकांची उपस्थिती होती.

प्रत्येक सणाला राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन
मालेगाव तालुक्‍यातील शिरपूर जैन हे गाव अंतरिक्ष पार्श्वनाथ जैन मंदिर, श्री जानगीर महाराज संस्थान व मिर्झा मियाँ यांच्या दर्ग्यामुळे धार्मिक दृष्टीने देशभरात ओळखले जाते. सण, उत्सव, परंपरा प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे जोपासली जात असल्याने, शिरपूर येथील सण उत्सवातून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडते. येथील मिर्झा मियाँ दर्ग्याचा संदल उरूस जानगीर महाराज संस्थानवर नेला जातो. तेथे प्रसादाचा मलिदा चढवला जातो. मिर्झा मियाँची हिरवी पताका लावली जाते. व नंतरच तो मलिदा भक्तांना वाटला जातो. त्यानंतर उरुसाला सुरवात होते.

पालखीचे पूजन होते मौलवींच्या हस्ते  
जाणगीर महाराजांच्या प्रत्येक उत्सवाचा नैवेद्य मिर्झा मियाँ यांच्या दर्ग्यावर श्रद्धेने चढवला जातो. शनिवारी (ता.22) संत जानगीर महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिंडी टाळ मृदंगाच्या गजरात मिर्झा मिया यांच्या दर्ग्यावर गेली. तेथे मौलवींनी पालखीचे पूजन केले. जानगिरी महाराज संस्थान कडून मिर्झामियांच्या मजारीवर चादर व अलंकार चढवण्यात आले. तेथील मौलवींना वस्त्र देऊन सत्कार करण्यात आला. मौलवींच्या उपस्थित जानगीर महाराजांची भगवी पताका दर्ग्यावर लावण्यात आली. या अनोख्या सोहळ्याला पंचक्रोशीतील हजारो भाविकांची उपस्थिती होती.

ही निसर्गाची किमयाच...!
शिरपूर जैन हे हिंदू-मुस्लिम व जैन बांधवांसाठी श्रद्धेचे ठिकाण आहे. मुस्लिम दर्ग्यावर आढळणारे चिंचेचे झाड, जानगीर महाराज संस्थानवर आहे. तर शिवमंदिरात आढळणारे बेलाचे झाड मिर्झा मियाँ यांच्या दर्ग्यावर आहे. त्यामुळे शिरपूरला जणू निसर्गानेच सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला. हा संदेश गेल्या 400 वर्षांपासून आपली सांस्कृतिक ओळख जोपासत आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com