सुब्रतो रॉय हाजीर हो ऽऽऽ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

शेकडो ग्राहकांना फसविणाऱ्या सहारा प्राईम सिटीचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांच्याविरुद्ध राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या नागपूर खंडपीठाने दहा हजार रुपयांचा जामीनपात्र वॉरंट जारी केला असून यापूर्वी दिलेल्या आदेशांचे पालन न केल्यामुळे पुढील सुनावणीला प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेशही दिले आहेत.

नागपूर - शेकडो ग्राहकांना फसविणाऱ्या सहारा प्राईम सिटीचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांच्याविरुद्ध राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या नागपूर खंडपीठाने दहा हजार रुपयांचा जामीनपात्र वॉरंट जारी केला असून यापूर्वी दिलेल्या आदेशांचे पालन न केल्यामुळे पुढील सुनावणीला प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेशही दिले आहेत. सुब्रतो रॉय यांच्यासह सुशांतो रॉय व कंपनीतील इतर प्रतिवादींच्या विरोधात हा आदेश पारित करण्यात आला आहे. 

नागपूरच्या वर्धा मार्गावरील सहारा प्राईम सिटीतील योजनेत जवळपास पाचशे लोकांनी फ्लॅटची नोंदणी केली होती. यातील बहुतांश लोकांना फ्लॅटचे बांधकाम होऊनही ताबा मिळालेला नाही. त्यामुळे राज्य ग्राहक आयोगाच्या नागपूर खंडपीठाने अनेक प्रकरणांमध्ये सहाराला ग्राहकांचे व्याजासह पैसे परत करण्याचे आदेश दिले आहेत. विभा मधुसूदन मेहाडिया यांनी ग्राहक राज्य आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीवर १९ सप्टेंबर २०१५ ला आयोगाने ७ मे २००९ पासून १२ टक्के व्याजासह १२ लाख ४६ हजार ८६ रुपये परत करण्याचे आदेश दिले होते.  तर नुकसानभरपाई म्हणून ३ लाख व तक्रारीचा खर्च ५० हजार रुपये हा तीस दिवसांच्या आत देण्याचा आदेश पारित केला होता. सुब्रतो रॉय व सुशांतो रॉय, नागपुरातील सहारा प्राईमचे व्यवस्थापक अनुजकुमार द्विवेदी यांनी आदेशांची पूर्तता करण्याबाबत विभा मेहाडिया यांनी नोटीस पाठविली होती. मात्र, आयोगाच्या आदेशांकडे दुर्लक्ष केल्यामुळे मेहाडिया यांनी ग्राहक संरक्षण कायद्यानुसार फौजदारी तक्रार दाखल केली. 

संधी देऊनही आदेशाची पूर्तता न केल्यामुळे राज्य आयोगाचे अध्यक्ष ए. पी. भंगाळे व न्यायिक सदस्य यु. एस. ठाकरे यांनी सुब्रतो रॉय व सुशांत रॉय यांच्याविरुद्ध ९ एप्रिल २०१९ दहा हजार रुपयांचा जामीनपात्र वॉरंट जारी केला. तसेच ७ जूनला होणाऱ्या सुनावणीला प्रत्यक्ष हजर राहून आदेशांचे पालन का करण्यात आले नाही, याचे उत्तर द्यावे, असेही आदेश देण्यात आले आहेत. विभा मेहाडिया यांच्यावतीने ॲड. नलीन मजिठिया यांनी बाजू मांडली.

Web Title: Sahara Prime City Surveyor Subrata Roy

टॅग्स