सहस्त्रकुंड धबधबा बहरला

संतोष मुडे
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

उमरखेड (जि. यवतमाळ) : यवतमाळ व नांदेड जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर प्रथमत: यावर्षी कडक उन्हामुळे कोरडा पडलेला सहस्त्रकुंड धबधबा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या रिमझिम पावसामुळे व ऑगस्टच्या सुरवातीपासून झालेल्या संततधार पावसामुळे प्रवाहित होऊन बहरला आहे. या धबधब्याचे विहंगम दृश्‍य पाहण्यासाठी आतुर झालेल्या पर्यटकांनी सध्या एकच गर्दी केली आहे.

उमरखेड शहरापासून 40 किलोमीटर, ढाणकीपासून 25, यवतमाळपासून 150 किमी. तर नांदेडपासून 100 किलोमिटर अंतरावर सहस्त्रकुंड हे पर्यटनस्थळ आहे. या धबधब्याला इतिहासाचीही जोड असल्याचे सांगण्यात येते. परशुरामाने येथे बाण मारल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे बाणगंगा या नावानेही हे ठिकाण ओळखले जाते. तसेच येथे नदीपात्रात वेगवेगळे लहानमोठे अनेक कुंड असल्यानेच सहस्त्रकुंड हे नाव प्रचलित झाले असल्याची माहिती आहे. सहस्त्रकुंडाच्या ठिकाणी महादेवाचे प्राचिन मंदिर असून श्रावण महिन्यातील दर सोमवारी भाविक या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करतात. मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या पैनगंगा नदीचे रुंदावलेले पात्र तसेच येथील कालापाषाण असलेल्या दगडाचा एकजीव आहे. जवळपास 60 ते 80 फुटांवरून कोसळणाऱ्या पाण्याचे व उडणारे फव्वारे यांचे मनोहारी व विहंगम दृश्‍य पाहण्यासाठी विदर्भ, मराठवाडा, तेलंगण, आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यातून निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने येथे येतात. येथे पर्यटन क्षेत्रात शासनाच्या विकासनिधीतून उंच मनोरा उभारण्यात आला आहे. या मनोऱ्यामुळे धबधब्याचे विहंगम दृश्‍य व मनोहारी दृश्‍य पाहण्याची सोय झाली आहे. मात्र, येथे पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याने अनेकांना आपला जिवही गमवावा लागल्याच्या घटना दरवर्षी घडतात. या दुर्दैवी घटना टाळण्यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्याची गरज असल्याचे मत पर्यटक व्यक्त करीत आहेत. धबधब्यावर पर्यटन क्षेत्र विकास निधीतून विद्यमान पालकमंत्री यांनी बरीच कामे केली असून लवकरच लांबवरून येणाऱ्या पर्यटकांना निवासाची व्यवस्था होणार असल्याचे सांगण्यात येते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sahastrakund waterfall flooded