साहेबराव वाघावर दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया

साहेबराव वाघावर दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया

नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या पळसगाव येथे शिकाऱ्याच्या पिंजऱ्यात अडकून पायाची तीन बोटे निकामी झालेल्या नऊ वर्षीय साहेबराव या वाघावर पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करण्यात आली. या वाघाच्या मज्जातंतूशी संबंधित वेदना क्षमवण्यासाठी न्यूरोमा आणि संधिवातातून आराम मिळण्यासाठी ही शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान, कृत्रिम पाय लावण्यासाठी आवश्‍यक असलेल्या वाघाच्या पायाचे मोजमाप घेण्यात आले आहे. परंतु, जोपर्यंत त्याच्या पायाची जखम भरणार नाही तोपर्यंत ही शस्त्रक्रिया करण्यात येणार नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 
शिकाऱ्याच्या पिंजऱ्यात सापडलेल्या पायावर गॅंगरिनची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्याला महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या गोरेवाडा येथील वन्यजीव बचाव केंद्रात ठेवण्यात आले आहे. मात्र, काही महिन्यापासून वाघाच्या पायाचा त्रास वाढल्याने तो मोठ्याने ओरडत होता. लंगडतही होता. पाय पिंजऱ्यात अडकल्याने पायाच्या नसा फाटून त्याला वारंवार जखमा होण्याचा त्रास होत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे वाघाच्या पायावर मज्जातंतूशी संबंधित वेदना क्षमवण्यासाठी वेदनादायक न्यूरोमा आणि संधिवातातून आराम मिळविण्यासाठी त्याचा पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया साहेबरावला दत्तक घेणारे प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. सुश्रुत बाभूळकर यांच्या उपस्थितीत डॉ. शिरीष उपाध्ये, डॉ. विनोद धूत, इंग्लडचे डॉ. लिडस आणि डॉ. पीटर जियानौदीस यांच्या मार्गदर्शनात पशुवैद्यकीय पथकाने केली. यामुळे वेदनादायक न्यूरोमा आणि संधिवातून आराम मिळण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर तब्येतीचा आढावा घेऊन नजीकच्या काळात साहेबराव या वाघाला कृत्रिम अवयव लावण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी लागणारे पायाचे मोजमापही घेण्यात आले आहे. आजची शस्त्रक्रिया सुमारे 25 मिनिटे चालली. वाघाला कृत्रिम पाय बसवण्याची जगातली पहिली शस्त्रक्रिया करण्यासाठी ऑर्थोपेडिक सर्जन आणि माफसुचे तज्ज्ञ डॉक्‍टर एकत्र आले आहेत. 
साहेबरावसाठी डॉ. बाभूळकर यांनी जर्मनीहून एओ फाउंडेशनमार्फत कृत्रिम पाय मागविला आहे. हे फाउंडेशन मानव आणि प्राण्यांचे फ्रॅक्‍चर ठीक करण्यामध्ये तज्ज्ञ मानले जातात. काही वैद्यकीय चाचण्या पूर्ण झाल्यानंतर साहेबरावला सिलिकॉनपासून बनविलेला पाय बसवण्यात येणार आहे, जो अगदी खराखुरा वाटेल. विशेष म्हणजे प्राण्यांसाठीचा हा कृत्रिम पाय अशापद्धतीने तयार करण्यात आलेला आहे की, प्राणी तो स्वतःहून काढूही शकत नाहीत. तरीही पाय लावल्यानंतर कोणताही संसर्ग होणार नाही, याचीही दक्षता घेण्यात येणार आहे. डॉ. विनोद धूत, डॉ. गौतम भोजने, डॉ. मयूर पावशे, डॉ. शालिनी ए. एस., डॉ. सुजित कोलंगाथ यांनी वाघांची शस्त्रक्रिया यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com