साहित्यिकांचे यवतमाळात खास वऱ्हाडी आतिथ्य!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

नागपूर : यवतमाळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होणाऱ्या साहित्यिकांना खास वऱ्हाडी आतिथ्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. हॉटेल्स, गेस्ट हाऊस आणि शाळा-महाविद्यालयांसह यवतमाळातील जवळपास पंधरा घरांमध्येही यजमानांनी निवासासाठी "बुकिंग' करून ठेवले आहे.

नागपूर : यवतमाळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होणाऱ्या साहित्यिकांना खास वऱ्हाडी आतिथ्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. हॉटेल्स, गेस्ट हाऊस आणि शाळा-महाविद्यालयांसह यवतमाळातील जवळपास पंधरा घरांमध्येही यजमानांनी निवासासाठी "बुकिंग' करून ठेवले आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 92वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 11, 12 व 13 जानेवारीला यवतमाळ येथे होणार आहे. विविध सत्रांमधील निमंत्रितांसह प्रतिनिधी, ग्रंथप्रदर्शनातील गाळेधारक असे एकूण साडेआठशे साहित्यिक व साहित्यप्रेमी या संमेलनात बाहेरच्या शहरांमधून येणार आहेत. या सर्वांसाठी हॉटेल्स, गेस्ट हाऊस, शाळा-महाविद्यालये आणि मंगल कार्यालयांमध्ये निवास व्यवस्था करण्यात आली आहे. व्हीआयपी, व्हीव्हीआयपींसह स्वेच्छेने सहभागी होणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अशात कुणाचीही गैरसोय होऊ नये, या उद्देशाने यवतमाळ येथील पंधरा कुटुंबांशी संपर्क साधून याठिकाणी साहित्यिकांची निवासाची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे या आवाहनाला सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे विदर्भाचे अस्सल आतिथ्य अनुभवण्याची संधी साहित्यिकांना मिळणार आहे. विशेष म्हणजे 8 ते 14 जानेवारी या कालावधीत यवतमाळ येथील सर्व प्रमुख हॉटेल्स, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दोनही गेस्ट हाउस यांचे बुकिंग आधीच झालेले आहे. यासोबत स्थानिक मंगल कार्यालये, काही महाविद्यालये, सामाजिक न्याय विभागाचे मुलींचे वसतीगृह, बीएड कॉलेजचे वसतिगृह आदी ठिकाणी निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. याच कालावधीत यवतमाळात डॉक्‍टरांची एक कॉन्फरन्स असल्यामुळे त्यासाठीदेखील काही हॉटेल्समध्ये बुकिंग करण्यात आले आहे. त्यामुळे यजमानांनी खबरदारी म्हणून घरांची पर्यायी व्यवस्था करून ठेवली आहे.

संमेलनाला येणाऱ्या एकाही पाहुण्याची गैरसोय होणार नाही, याची आम्ही पूर्ण काळजी घेतली आहे. त्यासाठी स्थानिक प्रशासनासह नागरिकांनीही सहकार्याची भूमिका ठेवली आहे आणि हीच आमच्यासाठी सर्वाधिक समाधानाची बाब आहे.
- घनश्‍याम दरणे
कार्यवाह, संमेलन आयोजन समिती

Web Title: sahitya sammelan news