जोशींच्या एककलमी अजेंड्याचा फटका साहित्य संमेलनाला

जोशींच्या एककलमी अजेंड्याचा फटका साहित्य संमेलनाला

नागपूर - महामंडळातील घडामोडी व संमेलनाशी संबंधित अधिकृत माहिती देण्याचे सर्वाधिकार आपल्याकडे आहेत, अशी भूमिका ठेवून महामंडळातील इतर पदाधिकारी व संमेलन आयोजकांच्या तोंडाला पट्ट्या लावण्याचा डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांचा उपक्रम त्यांच्याच अंगलट आला आहे. दुर्दैवाने या एककलमी अजेंड्याचा फटका साहित्य संमेलनाला बसल्याच्या प्रतिक्रिया साहित्य वर्तुळातून उमटत आहेत.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा विदर्भ दौरा सुरू झाला, त्या दिवसापासून डॉ. जोशी यांनी संपूर्ण कारभार स्वतःकडे केंद्रित ठेवला. त्यांनी महामंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिले संमेलन डोंबिवलीत झाले. त्यावेळी आयोजकांना आलेल्या अनुभवांची फारशी चर्चा झाली नाही. बडोद्यातील संमेलनाच्या वेळी आयोजकांनी जे सहन केले, तेच यवतमाळातील आयोजकांच्या बाबतीत झाले. मात्र, नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्याचा प्रकार घडला नसता यवतमाळातील आयोजकही संमेलन संपेपर्यंत शांतच राहिले असते. 

‘आम्ही काही बोललो की जोशी रागावतात’, अशी हतबलता व्यक्त करणारे आयोजक ‘घडलेल्या प्रकाराला जोशीच जबाबदार आहेत’ असे कुठलीही तमा न बाळगता माध्यमांशी बोलत आहेत. ‘संस्थात्मक मदत म्हणून आयोजकांना पत्राचा मसुदा तयार करून दिला’, असे डॉ. जोशी यांनी आज म्हटले आहे. मात्र, संमेलनाच्या पूर्वतयारीतही ‘घोषणा करणे’, ‘जाहीर करणे’, ‘प्रसिद्धीस देणे’ या भूमिकाही त्यांनी आयोजकांना ‘संस्थात्मक मदत’ म्हणूनच बजावल्या का, असा प्रश्‍न उपस्थित होतो. 

नोव्हेंबरच्या अखेरीस झालेल्या वादग्रस्त बैठकीत आयोजकांच्या सहनशक्तीचा बांध फुटण्याचा प्रसंग टळला आणि त्यासाठी आत्ताचा वाद कारणीभूत ठरला. अगदी तेच जोशी वगळता महामंडळातील उर्वरित पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत तीन वर्षांपासून सुरू होते. महामंडळाच्या अध्यक्षांसोबत सर्व पदाधिकाऱ्यांचे ‘गोड’ संबंध आहेत, असे कधीच झाले नाही. पण, जोशींच्या कार्यकाळातील कटुता स्पष्ट झळकत होती. त्यालाही आता तोंड फुटल्याचे बघायला मिळत आहे. काही उत्तम उपक्रम डॉ. जोशी यांनी महामंडळाच्या माध्यमातून राबविले, काही प्रमाणात योग्य पायंडेही पाडून दिले, पण एका चुकीमुळे सर्व गोष्टींवर पाणी फेरले गेले आहे, यात शंका नाही.

पत्रकारांना कुठली माहिती द्यायची आणि कुठली नाही, याचे अक्षरन्‌अक्षर डिक्‍टेशन देणारे डॉ. जोशी दोन दिवसांपूर्वी आयोजकांनी काढलेली पत्रके व्हॉट्‌सॲपवर शेअर करीत होते. आता देशभर या प्रकरणावरून वादळ उठले असताना जोशी, ‘मी थकलो आहे... मला सध्या त्रास देऊ नका’ असा व्हॉट्‌सॲपवर मेसेज टाकून शांत बसले आहेत.

स्वतःचेच चालवायचे आणि दुसऱ्यांचे काहीही ऐकून घ्यायचे नाही, या डॉ. जोशी यांच्या धोरणाचा फटका संमेलनाला बसला आहे. या प्रकरणात त्यांनी कुणाशी सल्लामसलत केली नाही. पत्र पाठवायची गरज नव्हती, पण फोनवर मतं जाणून घेता आली असती. पण, तसे झाले नाही. त्यामुळे आता घडलेल्या प्रकाराबद्दल लोक प्रश्‍न विचारत असताना आम्ही काहीच सांगू शकत नाही.
- कौतिकराव ठाले पाटील, अध्यक्ष, मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com