साईंचा गाभारा होणार सोन्याचा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

यासाठी जवळपास 7 किलो सोने आणि कारागिरांचा खर्च येणार आहे. हा खर्च अधिक असल्याने भाविक आणि दानदात्यांच्या मदतीने करण्यात येणार आहे

नागपूर - वर्धा रोडवरील साई मंदिरातील साईबाबांचे सिंहासन व त्या मागील चांदीच्या भागाला साईबाबा सेवा मंडळाकडून साडेतीन किलो सोन्याचा मुलामा चढविण्यात आला. साईबाबांचा संपूर्ण गाभाऱ्याला सोन्याचा मुलामा चढविण्यात येणार आहे. शिर्डीतील साई मंदिरांसारखेच स्वरूप मंदिराला देण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष मुन्ना यादव यांनी गुरुवारी (ता. 11) पत्रकार परिषदेत सांगितले.

मंदिरातील साईबाबांचे सिंहासन आणि त्या मागील चांदीच्या भागाला सोन्याचा मुलामा चढविण्यासाठी साडेतीन किलो सोने लागले. त्यासाठी जवळपास 1 कोटी 25 लाख रुपयांचा खर्च आला. यासाठी निविदा मागवून सोने खरेदी करण्यात आले. तसेच अमृतसर येथील 8 कारागिरांनी सतत 25 दिवस काम केले. बाबांच्या ओट्यावरील आणि समोरील व आजूबाजूच्या भागाला आणि महिरप व इतर वस्तूंना सोन्याचा मुलामा दिलेला नाही. त्यामुळे आता त्या भागालासुद्धा सोन्याचा मुलामा देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. यासाठी जवळपास 7 किलो सोने आणि कारागिरांचा खर्च येणार आहे. हा खर्च अधिक असल्याने भाविक आणि दानदात्यांच्या मदतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी दानदात्यांनी समोर येण्याचे आवाहन यादव यांनी केले. मंदिरासमोरील मोकळ्या जागेत पक्के शेड उभारण्यात येईल. तसेच मोकळ्या जागेवर कोटा आणि मार्बल लावण्यात येणार आहे. 2018 मध्ये साईबाबांची 100 वी पुण्यतिथी वर्षे मंडळातर्फे मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येणार आहे. त्याचीदेखील मंडळातर्फे जोरात तयार सुरू आहे.

शिर्डीप्रमाणेच मंडळातर्फे भाविकांसाठी आरोग्यविषयक सोयी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सचिव अविनाश शेगावकर यांनी सांगितले. मंडळातर्फे गेल्या वर्षभरात राबविलेल्या आणि पुढील वर्षी राबविण्यात येणाऱ्या कामांची माहिती दिली. पत्रकार परिषदेला घनश्‍याम राठी, राजेंद्र दांडेकर, कैलास जोगानी, राजेंद्र देशमुख, प्रभाकर मुंडले, डॉ. रवींद्र भोयर, महेश टेंभरे होते.

Web Title: Sai Mandir to be developed