साईबाबासह अन्य आरोपींची उच्च न्यायालयात धाव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

नागपूर - नक्षल्यांना मदत करीत असल्याच्या संशयावरून तीन वर्षांपूर्वी अटक करण्यात आलेले दिल्ली विद्यापीठाशी संलग्न रामलाल आनंद महाविद्यालयातील इंग्रजीचे प्राध्यापक प्रो. जी. एन. साईबाबा यांच्यासह जेएनयूचा विद्यार्थी हेम मिश्रा, पत्रकार प्रशांत राही, महेश तिर्की, पांडू नरोटे, विजयी तिर्की यांनी गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

काही दिवसांपूर्वीच सत्र न्यायालयाने साईबाबा आणि मिश्रा, राही, महेश तिर्की, नरोटे यांना जन्मठेप तर विजयी तिर्की याला 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला आव्हान देणाऱ्या दोन याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. यापैकी एका याचिकेत साईबाबा तर दुसऱ्या याचिकेमध्ये अन्य आरोपींचा समावेश आहे. या प्रकरणातील सर्व साक्षी, पुरावे तपासल्यानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी या आरोपींना देशविघातक कृत्य, बंदी घातलेल्या संघटनांचा सदस्य असणे याबाबत यूएपीए कायद्याच्या भादंवि कलम 13, 18, 20, 38, 39, 120 अन्वये दोषी ठरवून जन्मठेपेची तर विजय तिर्की याला 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

असे आहे प्रकरण
गडचिरोली पोलिसांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी हेम मिश्रा याला ऑगस्ट 2013 मध्ये महेश तिर्की व पांडू नरोटे या दोन युवकांसह अहेरी येथे अटक केली होती. हेम मिश्राच्या माहितीवरून पोलिसांनी नंतर सप्टेंबर 2013 मध्ये प्रशांत राही यासाठी अटक केली. हे दोघेही प्रमुख नक्षली नेते गणपती व नर्मदाक्का आणि प्रो. साईबाबा यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करीत असल्याचे त्यांच्या चौकशीत उघड झाले. त्यानंतर 9 मे 2014 रोजी पोलिसांनी दिल्लीतून प्रो. साईबाबाला अटक केली. जामीन न मिळाल्यामुळे साईबाबा 25 डिसेंबर 2015 रोजी पोलिसांना शरण आला व त्यांची रवानगी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.

Web Title: saibaba & other accused go to high court