संत नरसिंग महाराजांनी केली पांडुरंगाच्या मूर्तीची जखम बरी

मुकुंद कोरडे
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

- 1870 च्या शासकीय गॅझेटमध्ये उल्लेख
- श्री नरसिंग महाराज लीला अमृत या ग्रंथामध्ये वर्ण
- श्री नरसिंग यात्रेत गोपाळकाला व दहिहांडी उत्सव 

अकोट (जि.अकोला) : वऱ्हाडातील प्रसिद्ध संत श्री नरसिंग महाराजांनी पंढरपुरात पांडुरंगाच्या मूर्तीच्या पायाला झालेली जखम स्वतः उपचार करून बरी केल्याची भक्तीकथा श्री नरसिंग महाराज लीला अमृत या ग्रंथामध्ये वर्णन केलेली आहे. तसेच या घटनेचा उल्लेख 1870 च्या शासकीय गॅझेट मध्येही असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सतीश आसरकर यांनी दिली.

अकोटात संत श्री नरसिंग महाराज यांचा यात्रा महोत्सव सोमवारी असून त्या निमित्ताने भाविक भक्तांची मांदियाळी श्री नरसिंग महाराज मंदिरात सुरू होती. यानिमित्त संत श्री नरसिंग महाराजांच्या विविध चमत्काराचे कथन करणे मंदिर परिसरात सुरू झाले असून भाविक भक्त संत नरसिंग महाराजांच्या लीला आठवून भक्तिभावाने नतमस्तक होत आहेत.

अशी आहे माहिती
19 व्या शतकाच्या मध्यावर संत नरसिंग महाराजांचा कालावधी होता. महाराजांचे शेकडो भक्त होते. त्या काळी भाविक भक्तांनी नरसिंग महाराजांना पांडुरंगाच्या दर्शनासाठी साकडे घातले. भक्तवत्सल महाराजांनी भाविकांना क्षणार्धात भाविकांना पंढरपूर येथे दर्शनासाठी गेले. अशाच एकावेळी महाराजांचा जंगलात असलेल्या पुरातन महादेव मंदिरात मुक्काम होता. हे महादेव मंदिर पर्जन्येश्वर नावाने प्रसिद्ध आहे. या मंदिरात महाराज मुक्कामाला असताना अकोटचे त्यावेळचे सावकार गणोबा नाईक आसरकर त्यांचे भक्त झाले. महाराजांनी गणोबा नाईक व त्यांचे धाकटेपुत्र वासुदेव यांना पंढरीच्या दर्शनासाठी नेले. दर्शनाच्या रांगेत उभे असताना एका माथेफिरूने एक दगड पांडुरंगाच्या मूर्तीला फेकून मारला. त्यामुळे त्या संजीवन मूर्तीला इजा झाली. पांडुरंगाच्या पायाला झालेल्या जखमेतून रक्त वाहू लागले. हे पाहून भाविकभक्त एकच आक्रोश करू लागले. त्यामुळे वातावरण गंभीर झाले. यावेळी लंगोटीवर असलेल्या संत नरसिंग महाराजांनी पांडुरंगाची जखम मी बरी करतो असे सांगताच तेथील भाविकांनी त्यांची टर उडवली. पण श्री संत नरसिंग महाराजांनी कोणालाही न जुमानता तेथील बुका पांडुरंगाच्या जखमेला आणि स्वतःच्या जवळील उपरण्याची चिंधी फाडून पांडुरंगाच्या पायाला बांधली व पांडुरंगाला मनोभावे नमस्कार केला. त्यामुळे पांडुरंगाची जखम पूर्णपणे नाहीशी झाल्याचा उल्लेख श्री नरसिंग महाराज लीला अमृतामध्ये आहे. या घटनेचा उल्लेख 1870 च्या शासकीय गॅझेट मध्येही असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सतीश आसरकर यांनी दिली.

Image may contain: one or more people, crowd, sky and outdoor

यात्रेत गोपाळकाला व दहिहांडी उत्सव 
अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात हजारो भाविक व व्यापारी वर्ग या यात्रा महोत्सवामध्ये सहभाग घेत असतात. श्री संत नरसिंग महाराज यात्रा महोत्सव संपूर्ण वऱ्हाडात प्रसिद्ध आहे. यात्रा महोत्सवाची सुरवात नरसिंग महाराजांच्या तीर्थस्थापनेपासून झाली आहे. बुधवारी (ता.13) नरसिंग महाराजांची तीर्थ स्थापना झाली होती. महाराजांचे गुरु श्री संत मियाँसाहेब तक्त स्थापना शुक्रवारी (ता.16) झाली. नरसिंग महाराजांची पालखी शनिवारी (ता.16) गुरु पूजनेसाठी उमरा येथे गेली होती. रविवारी (ता.17) यात्रा प्रारंभ झाली होती. व सोमवारी (ता.18) गोपालकाला व दहिहांडी उत्सव पार पडला. त्यासाठी श्री ची पालखी सुभाषबुवा वर्मा व अनंतराव देशमुख यांच्या नेतृत्वात सकाळी नऊ वाजता श्री नरसिंग महाराजाचे मंदिरामधून पालखी नगर प्रदक्षिणेसाठी निघून, शहरातील प्रमुख मार्गांनी मार्गक्रमण करित यात्रा चौकातुन परत मंदिरात चार वाजताच्या दरम्यान आली. त्यानंतर मंदिरात दहिहांडी व गोपालकाल्याचा उत्सव आनंदात करण्यात आला. संस्थानचे अध्यक्ष सतिष आसरकर यांच्या हस्ते गोपालकाल्याची महापूजा करण्यात आली. यात्रा महिनाभर चालणार असून, विविध पारंपारीक वस्तुंचे विक्रेते, शेकडो व्यापारी, गृहपयोगी साहित्याची आकर्षक दुकाने सजविल्या जातात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saint narasing maharaj recovers wounds of panduranga idol