सकाळ-ऍग्रोवन सरपंच महापरिषदेचा थाटात समारोप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

नागपूर - सकाळ-ऍग्रोवनच्या सहाव्या सरपंच महापरिषदेत दोन दिवस चाललेल्या मंथनातून कृषिकेंद्रित ग्रामविकासाची अभ्यासपूर्ण शिदोरी घेऊन सरपंच मंडळी आपल्या गावाकडे रवाना झाली.

नागपूर - सकाळ-ऍग्रोवनच्या सहाव्या सरपंच महापरिषदेत दोन दिवस चाललेल्या मंथनातून कृषिकेंद्रित ग्रामविकासाची अभ्यासपूर्ण शिदोरी घेऊन सरपंच मंडळी आपल्या गावाकडे रवाना झाली.

भारावलेल्या वातावरणात दोनदिवसीय सरपंच महापरिषदेचा समारोप सोमवारी सायंकाळी झाला. या वेळी व्यासपीठावर आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष तथा हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार, सकाळ माध्यम समूहाचे संचालक (तंत्रज्ञान) भाऊसाहेब पाटील, मुख्य संपादक श्रीराम पवार, विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक शैलेश पांडे उपस्थित होते.
महापरिषदेच्या समारोपाची घोषणा करताना ऍग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण म्हणाले, की ग्रामविकासाच्या प्रक्रियेत कृतिशील होणारे प्रशिक्षण या महापरिषदेच्या रूपाने सरपंचांना मिळाले आहे. सरपंचांना मार्गदर्शन करण्यासाठी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे येणार होत्या. मात्र, काही अपरिहार्य कारणांमुळे त्या महापरिषदेला उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यामुळे दोन दिवसांत झालेल्या चर्चेचे मुद्दे; तसेच सरपंचांनी मांडलेल्या सूचना ऍग्रोवनच्या माध्यमातून ग्रामविकास मंत्रालयापर्यंत पोचविल्या जातील.

या महापरिषदेत ग्रामविकासाची सर्वांगीण चर्चा झाली. विशेष म्हणजे सरपंचांचे मोबाईल नंबर थेट मुख्यमंत्र्यांनी मागवून घेतलेत. या सरपंचांशी गावांच्या समस्यांबाबत ऑनलाइन संपर्क साधण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. एवढेच नव्हे तर ऊर्जामंत्र्यांनी आपला मोबाईल क्रमांक देऊन एसएमएसद्वारे समस्या कळविल्यास तातडीने उपाय करण्याचा विश्वास दिला. त्यामुळे महापरिषदेतून परतणाऱ्या सरपंचांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. शिवाय येण्याचे सार्थक झाल्याचे समाधानही होते.

ऊर्जामंत्र्यांनी मोबाईल क्रमांक दिल्यामुळे सरकार दरबारी महत्त्वाची व्यक्ती म्हणून आपली नोंद होत असल्याची भावनाही सरपंचांमध्ये निर्माण झाली. जलयुक्त शिवार, सौरऊर्जा, गटशेती, ग्रामविकास, आदर्श गाव योजना, ग्रामस्वच्छता, ग्रामपंचायत व ग्रामसभेचे अधिकार, सरपंचांचे हक्क आणि कर्तव्य अशा विविध विषयांवर महापरिषदेत चर्चा झाली.

विशेष म्हणजे महापरिषदेत सहभागी झालेल्या महिला सरपंचांनी दोन दिवस टिपणे घेतली. त्यामुळे सरकारी कार्यालये किंवा ग्रामसभेला हिमतीने सामोरे जाण्याचे बळ मिळाल्याची भावना महिला सरपंचांमध्ये दिसत होती.

महापरिषदेच्या व्यासपीठाशिवाय वेळ मिळेल तसा युवक सरपंचांनी सभागृहाच्या बाहेर शक्‍य तेव्हा एकत्र येत नियमावली व माहितीची देवाणघेवाण केली. सरपंचांना भविष्यात जादा अधिकार मिळतील. मात्र, आपल्याला कर्तव्य व जबाबदारीलादेखील सामोरे जावे लागणार आहे, याचे संकेतदेखील या महापरिषदेतून सरपंचांना मिळाले.

सरपंचपदाच्या माध्यमातून हिवरेबाजारची जागतिक यशोगाथा तयार करणारे पोपटराव पवार हे या महापरिषदेतील सरपंचांचे स्फूर्तिस्थान ठरले. पवार यांनी केंद्र व राज्य शासनाची ग्रामविकासाची भविष्यकालीन धोरणे सांगितल्यामुळे गावाचा विकास कोणत्या पद्धतीने करायचा याची निश्‍चित माहिती नव्या सरपंचांना मिळाली.

ऊर्जामंत्र्यांनी केले कौतुक
एक हजार सरपंचांना एकाच व्यासपीठावर बोलवून प्रशिक्षित करणे ही अवघड जबाबदारी असल्याचे सांगत स्वतः ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व सरपंचांना टाळ्या वाजवून सकाळ-ऍग्रोवनचे अभिनंदन करण्यास सूचविले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्यांनीदेखील या सरपंच महापरिषद उपक्रमाचे कौतुक केल्यामुळे स्वच्छ, सुंदर, आदर्श गावाचे स्वप्न घेऊन सरपंच परतले.

Web Title: sakal agrowon sarpanch mahaparishad