माझे शहर असावे कचरामुक्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

सकाळ एनआयईने शाळांमध्ये वक्‍तृत्व स्पर्धा घेण्याचा सुरू केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. या उपक्रमामुळे स्मार्ट शहराची संकल्पना साकारण्यास मदत होते. शिवाय विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पनेतील शहर कसे असावे, हे सांगण्याची संधी मिळते.
- ममता गवळी, सचिव शांतिनिकेतन शिक्षण संस्था

डिजिटल सुविधांसह नियमांचे व्हावे पालन : सकाळ एनआयई वक्‍तृत्व स्पर्धा

 

नागपूर: स्वच्छता हेच सर्व आजारांवरील रामबाण औषध आहे. शहरातील रस्ते व तेथील स्वच्छताविषयक गोष्टींनीच त्या शहराची ओळख होते. त्यामुळेच सर्वांनी स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. माझे शहर कचरामुक्‍त असावे, असे मत विद्यार्थ्यांनी आज (ता. 10) व्यक्‍त केले.

सकाळ माध्यम समूहाच्या एनआयईतर्फे "माझे शहर कसे असावे' या विषयावर विश्‍वकर्मानगर येथील श्रीनिकेतन माध्यमिक विद्यालयात वक्‍तृत्व स्पर्धा घेण्यात आली. संस्थेच्या सचिव ममता गवळी, मुख्याध्यापक विजय मालेवार, पर्यवेक्षक भावना भोतमांगे, शिक्षक चंद्रकांत अंबुलकर, किशोर सोनटक्के, सुमेर कावळे, स्मिता गवळी, अविनाश शेंडे, रूपा इटनकर, गुरुदेव उरकुडे, सोनाली डोंगरे, परीक्षक सदाशिव ठाकरे, रेखा सरागे उपस्थित होते. मोठ्यांच्या कल्पनेतून त्यांच्या कल्पनेतील शहर कसे असावे, हे नेहमीच सांगितले जाते. मात्र, जे कधी कधी मोठ्यांच्या नजरेस पडत नाही, ते विद्यार्थ्यांच्या नजरेस पडते. त्यांच्या कल्पनादेखील चांगल्या असतात. पण, त्यांची दखल घेतली जात नाही. सकाळच्या एनआयईने हीच बाब हेरून विद्यार्थ्यांच्या मनातील कल्पनांना वक्‍तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकारण्याची संधी दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह होता.

माझे शहर कसे असावे, हे सांगताना प्राची मसूरकर, तृप्ती नरड, स्नेहा भुसारी, सुवासिनी ओहेकर यांनी अनेक शहरांची डिजिटलकडे वाटचाल सुरू आहे. तशीच वाटचाल माझ्याही शहराची व्हावी. वाहतुकीच्या व स्वच्छताविषयक नियमांचे पालन व्हावे. हेल्मेट सक्‍ती म्हणून नव्हे, तर स्वत:ची सुरक्षा म्हणून वापरावे, महिला, बालके, वृद्धांना शहरात वावरताना भीती वाटू नये, पोलिसांचा वचक असावा. शहर आदर्श करणे सर्वांची जबाबदारी आहे, तीच ओळखून प्रत्येकाने ध्वनिप्रदूषण होऊ नये याची काळजी घेतली, तर स्मार्ट शहराची संकल्पना प्रत्यक्षात साकारेल, असे मत विद्यार्थिनींनी व्यक्‍त केले. विजेत्या ठरलेल्या सरिता सिंह, स्वप्नील तायडे, कल्याणी तायडे, तनू रामटेके व पंडित बच्छराज विद्यालयाची ईश्‍वरी डाखोळे यांना गौरविण्यात आले. संचालन माधुरी बाजारे यांनी केले. आभार ज्योती लाखे यांनी मानले.

 

Web Title: sakal nie program in nagpur