भांडणांपेक्षा संभाजी मांडणे आवश्‍यक - डॉ. अमोल कोल्हे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

नागपूर - संभाजी राजेंच्या जीवनचरित्रासंदर्भात प्रत्येक इतिहासकार वेगळा विचार मांडतात. सर्वांचा केंद्रबिंदू संभाजीच आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाने भांडण्यापेक्षा लोकांपुढे संभाजी मांडणे अधिक महत्त्वाचे आहे, असे स्पष्ट मत सुप्रसिद्ध अभिनेता डॉ. अमोल कोल्हे याने गुरुवारी व्यक्त केले. ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याच्या प्रचारासाठी नागपुरात आला असताना अमोलने ‘सकाळ’च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.

नागपूर - संभाजी राजेंच्या जीवनचरित्रासंदर्भात प्रत्येक इतिहासकार वेगळा विचार मांडतात. सर्वांचा केंद्रबिंदू संभाजीच आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाने भांडण्यापेक्षा लोकांपुढे संभाजी मांडणे अधिक महत्त्वाचे आहे, असे स्पष्ट मत सुप्रसिद्ध अभिनेता डॉ. अमोल कोल्हे याने गुरुवारी व्यक्त केले. ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याच्या प्रचारासाठी नागपुरात आला असताना अमोलने ‘सकाळ’च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.

माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान व माजी आमदार मोहन मते मित्रपरिवारच्या वतीने २२ ते २८ डिसेंबरपर्यंत रेशीमबाग मैदानावर या महानाट्याचे प्रयोग आयोजित केले आहेत. संभाजीराजेंवरील महानाट्य करताना अत्यंत शुद्ध हेतू असल्यामुळे यावर वाद होण्याचा प्रश्‍नच नव्हता. परंतु, प्रत्येक अभ्यासकाला आपापल्या पद्धतीने संभाजीराजे मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे संभाजींच्या संदर्भातील कुठल्या तरी मुद्द्यावरून भांडण होण्यापेक्षा त्यांचे चरित्र योग्य पद्धतीने लोकांपर्यंत येणेच अधिक महत्त्वाचे आहे, असे अमोल म्हणाला.

शिवाजी महाराज आणि संभाजीराजे या दोघांच्याही भूमिका अमोलने साकारल्या आहेत. या भूमिकांमधील फरक सांगताना तो म्हणाला, ‘शिवाजी महाराजांची पहिलेपासून सुरुवात करावी लागली. ते राजे होते आणि सरदारही होते. संभाजीराजेंचा जन्मच राजपुत्र म्हणून झाला होता. दोघांच्या चालण्याबोलण्यातही फरक होता. कर्तृत्ववान माणसाला संसारी सुख नसते, असे अनेकांना वाटत असते. पण शिवाजी महाराज आणि संभाजीराजे हे दोघेही योद्धा होते. तसेच कुटुंबवत्सलही होते.’

चंद्रकांत मांढरे यांनी साकारलेली शिवाजी महाराजांची भूमिका आतापर्यंतची सर्वोत्तम असल्याचेही त्याने आवर्जून सांगितले. माजी आमदार मोहन मते, संजय खुळे, माजी नगरसेवक हितेश जोशी यांची उपस्थिती होती. 

‘बॉलीवूडला छत्रपतींचा विसर’
देशावर प्रभाव पाडणारा एवढा मोठा योद्धा महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या रूपाने होऊन गेला. परंतु, त्यांच्यावर बॉलीवूडमध्ये कुणालाही चित्रपट सुचू नये, हे दुर्दैव असल्याची खंत डॉ. अमोल कोल्हे याने पत्रपरिषदेत व्यक्त केली. ‘जाणता राजा’ ही महाराजांची गोष्ट होती, ‘शिवपुत्र संभाजी’ त्यांच्या मुलाची कथा आहे. मुलगा एक पाऊल पुढे असल्याचा आनंद प्रत्येकच वडिलाला असतो. दोन्ही महानाट्यांमधील फरक मुळातच काळाचा आहे. ‘जाणता राजा’चे महाराष्ट्रावर संस्कार आहेत. ते संस्कार कायम ठेवून संभाजींची कथा मांडण्याचा प्रयत्न हे महानाट्य करीत आहे, असेही अमोल म्हणाला. माजी महापौर प्रवीण दटके यांची उपस्थिती होती.

Web Title: Sambhaji need to be presented more than Quarrel says amol kolhe