Land-Mafia
Land-Mafia

भूमाफियांचे कंबरडे मोडण्यासाठी ‘समता सेल’

नागपूर - नागपूर शहरातील भूमाफियांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलिस आयुक्‍तांनी एसआयटी स्थापन केली होती. त्याच धर्तीवर पोलिस अधीक्षकांनीसुद्धा ग्रामीण भागातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी ‘समता सेल’ नावाने पथक स्थापन केले आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न करणारे भूमाफिया तसेच कर्ज देऊन जाळ्यात ओढणाऱ्या सावकारांपासून संरक्षण मिळावे, या उद्देशाने या पथकाची स्थापना करण्यात आली. 

शहरात भूमाफियांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम्‌ यांनी एसीपी सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन केली होती. यामध्ये जवळपास दीड हजार भूखंडधारकांना न्याय मिळाला. कुख्यात भूमाफिया दिलीप ग्वालवंशी यांच्या तावडीतून बळकावलेली जवळपास २८ कोटी रुपयांची जमीन पोलिसांनी सोडवून मूळ मालकांच्या ताब्यात दिली होती. त्याच धर्तीवर पोलिस अधीक्षक शैलेष बलकवडे यांनी ‘समता सेल’ची स्थापना केली. या सेलचे नेतृत्व पोलिस उपअधीक्षक रवींद्र चव्हाण यांच्याकडे दिले. पथकात ८ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील शेतीवर अवैध कब्जा करणे, तसेच पैशाच्या मोबदल्यात शेती नावावर लिहून घेण्यासारख्या प्रकारांवर आळा घालण्यासाठी पाऊल उचलण्यात आले. यासोबतच भूखंड किंवा शेतीच्या खरेदी विक्रीत बनावट कागदपत्रे लावून विकण्याच्या तक्रारी येत आहेत. अशा फसवणुकीच्या तक्रारीवरही समता सेल लगेच कारवाई करणार आहे. 

सामाजिक सुरक्षा 
समता सेलमध्ये तक्रार आल्यानंतर पोलिसांच्‍या पथकामार्फत शहानिशा करण्यात येते. तक्रारीवर गांभीर्याने दखल घेऊन लगेच कारवाईस सुरुवात होते. सामाजिक शांतता आणि सुरक्षा अबाधित राहण्यासाठी समता सेल उपयुक्त ठरणार आहे. ग्रामीण भागातील भूमाफियांवर कडक कारवाई करून शेतकरी आत्महत्या रोखणे किंवा फसवणूक होण्यापासून वाचविण्याचा उद्देश आहे.

ग्रामीण भागातील भूमाफियांनी चांगलाच जम बसवला आहे. त्यामुळे आतापर्यंत गुन्हे दाखल असणाऱ्या भूमाफियांची कुंडली काढली. दाखल गुन्ह्यांनुसार भूमाफियाची यादी बनवली. जमीन-भूखंडासंदर्भात फसवणूक झालेल्यांनी समता सेलमध्ये तक्रारी कराव्यात. तक्रारींची गांभीर्याने दखल घेण्यात येईल.
- शैलेश बलकवडे, जिल्हा पोलिस अधीक्षक, ग्रामीण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com