वाळू माफियांचा पाचवा "अटॅक' : आता मंडळ अधिकाऱ्याला मारहाण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

वाळू ट्रेडिंगवर नियंत्रण मिळविण्यासाठी नदी पात्रातील वाळू घाटावर महसूल विभागाने कर्मचाऱ्यांचा रात्रीचा बंदोबस्त लावला आहे. यासोबतच फिरत्या पथकांच्या माध्यमातूनही वाळूच्या अवैध वाहतुकीला लगाम घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. मंगळवारी रात्री शरद नांदूरकर व टेंभूरडोहचे पटवारी पवन बागडे हे सावनेरचे तहसीलदार करंडे यांच्या निर्देशावरून खापा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. 

नागपूर/खापा : सावनेर तालुक्‍यातील खापरखेडा येथे वाळूच्या अवैघ उत्खननाच्या वादातून एका युवकाचा खून झाल्याची घटना नुकतीच घडली होती. यापाठोपाठ आता पुन्हा एका वाळू माफियाने मंडळ अधिकाऱ्यास मारहाण केल्याची घटना मंगळवारी (ता.3) रात्री 11.30 वाजताच्या सुमारास खापा परिसरात घडली. वाळूचे अवैध उत्खनन व वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांशी हल्ला करण्याची ही सावनेर तालुक्‍यातील पाचवी घटना आहे. 

केळवदचे मंडळ अधिकारी शरद नांदूरकर यांना मारहाण केल्याची तक्रार खापा पोलिसांत करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रफुल्ल कापसे, त्यांचा भाऊ उत्तम व दिवानजी रोशन महंत यांच्यावर गुन्हे नोंदविले आहेत. 

Image may contain: 1 person, eyeglasses
मंडळ अधिकारी शरद नांदूरकर 

 

गस्तीवर असताना घडली घटना 
वाळू ट्रेडिंगवर नियंत्रण मिळविण्यासाठी नदी पात्रातील वाळू घाटावर महसूल विभागाने कर्मचाऱ्यांचा रात्रीचा बंदोबस्त लावला आहे. यासोबतच फिरत्या पथकांच्या माध्यमातूनही वाळूच्या अवैध वाहतुकीला लगाम घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. मंगळवारी रात्री शरद नांदूरकर व टेंभूरडोहचे पटवारी पवन बागडे हे सावनेरचे तहसीलदार करंडे यांच्या निर्देशावरून खापा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते.

 

Image may contain: sky and outdoor

नांदूरकर यांच्याशी वाद 
खापा-सावनेर मार्गावरील के. जॉन पब्लिक स्कूलजवळ मंगळवारी रात्री 11.30 वाजता रेतीने भरलेले एक वाहन नांदूरकर यांनी थांबविले. ट्रकचालक विना रॉयल्टी वाळूची वाहतूक करीत असल्याचे तपासात लक्षात आले. त्यामुळे ट्रक जप्त करून पुढील कारवाईसाठी सावनेर तहसील कार्यालयात घेऊन जाण्याचा प्रयत्न नांदूरकर यांनी केला. ही माहिती चालकाने ट्रक मालक प्रफुल कापसे यांना दिली. यानंतर रोशन महंत हा एका साथीदारासह ट्रकजवळ पोहचला. महंत याने नांदूरकर यांच्याशी वाद घालत गैरवर्तन केले. ट्रक सोडण्यास नकार दिल्यावर महंतने कापसे बंधूंना माहिती दिली. दोघेही घटनास्थळी पोहचले. रेतीची रॉयल्टी भरली असल्याचे उत्तम कापसे यांनी नांदूरकर यांना सांगितले. मात्र, त्याची पावती दाखविली नाही. 

Image may contain: tree, outdoor and nature

सविस्तर वाचा - जीपने केला पाठलाग अन्‌ मंगेशचा झाला गेम
 

वाळू वाहतुकीच्या वेळी रॉयल्टी पावती ट्रकचालकसोबत असावी, या नियमाचा दाखला देत त्यांनी कार्यवाही करणार असल्याचे सांगितले. ही माहिती त्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली होती. उत्तम कापसे मद्य प्राशन करून होता, याशिवाय तो अभद्र वागत होता. नांदूरकर यांनी या सर्व प्रकाराचा मोबाईलवर व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली. व्हिडिओ करीत असताना पाहून प्रफुलचा पारा चढला व त्याने नांदूरकर यांना मारहाण केली. त्यानंतर उत्तम व महंत यांनीही मारहाण केली.

घटनेनंतर शरद नांदूरकर यांनी ट्रक सावनेर तहसील कार्यालयात जमा करून सावनेर पोलिसात तक्रार दिली. मात्र, घटनास्थळ हे खापा हद्दीत येत असल्याने तशी रितसर तक्रार करण्यात आली आहे. नांदूरकर यांच्या तक्रारीवरून खापा पोलिसांनी विविध कलमान्वे आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. 

Image may contain: sky, outdoor and nature

एका रॉयल्टीचा अनेकदा वापर 
खापा पोलिस स्टेशन हद्दीत रामडोंगरी (क) या वाळू घाटातून उचल करण्याची परवानगी उत्तम कापसे यांनी नियमानुसार मिळवली होती. रात्री वाहतूक करण्याची परवानगी असल्याने साठ्यातून रेतीचे उचल करून रात्री वाहतूक केल्या जात होती. एकाच रॉयल्टीचा उपयोग एकदाच करण्याचा नियम आहे. मात्र, रेती तस्कर एका रॉयल्टीवर अनेकदा रेतीची वाहतूक करीत असतात. 

महिला अधिकाऱ्याशी अभद्र वागणूक 
सावनेर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार चैताली दराडे यांनाही वाळू माफियाने सावनेर पोलिसांच्या हद्दीत उत्तम कापसे यांचा रेतीने भरलेला ट्रक आढळून आला होता. त्यावर कारवाई करीत असताना कापसे यांनी दराडे यांच्याशी अभद्र वागणूक केली होती. तेव्हा त्यांनीही सावनेर पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. यावरून रेतीच्या अवैध वाहतुकीत लिप्त असलेल्या कापसे यांची हिंमत किती वाढली आहे, याची अंदात येतो. 

तहसीलदारावर पिस्तूल रोखली, डीवायएसपीवर ट्रक चढविला 
सचिन यादव सावनेरचे तहसीलदार असताना वाळू माफियावर कारवाई करण्यासाठी ते वलनी परिसरात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर वाळू तस्करांनी पिस्तूल रोखली होती. 2014 मध्ये पोलिस उपविभागीय अधिकारी आयपीएस गौरव सिंग यांच्यावरही ट्रक चढविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तर पटवारी नितीन बोबडे यांनाही मारहाण करण्यात आली आहे. मंगळवार रात्री घडलेली घटना याच मालिकेतील आहे. 

आजवर गेले अनेकांचे जीव 
सावनेर तालुक्‍यातील भानेगाव, वलनी, वाकी, रामडोंगरी, गोसेवाडी, रायवाडीसह अनेक घाटांवर वाळू माफियांची दहशत गेल्या दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नुकतेच वारेगाव येथे तीन दिवसांपूर्वी मंगेश बागडे या युवकाचा खून झाला होता. तर या परिसरात वाळू उपशाच्या वादातून आतापर्यंत चार खून झाले आहेत. 

मशीन्स व हल्ल्यांसाठी अवैध शस्त्रसाठा 
विशेष म्हणजे, या रेती माफियांकडे अवैध पिस्तुले असल्याने परिसरात रेती माफियांची दहशत आहे. साठवलेली रेती उचलण्याची परवानगी घेतली जाते. यात पोकलेन, जेसीबी यासारख्या अवजड मशीन्सचा वापर केला जातो. यासोबतच दिवसभर वाळूमाफिया सोबत शस्त्रसाठा घेउन असतो. अनेक घटनांमध्ये पिस्तुलचा वापर झाला आहे. 

क्लिक करा - महिलांनो रात्र झाली...वाहन नसले तर पोलिसांना फोन करा

आंदोलने, निवेदनांचाही फायदा नाही 
घाटावरून रेती माफियाची दहशत गुंडागर्दी बंद करण्याची मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीने विभागीय आयुक्त डॉ संजीव कुमार यांना निवेदनाच्या माध्यामातून केली होती. तर महसूल कर्मचाऱ्यांना घाटावर रात्री ड्युटी व गस्त लावल्याने गावागावांत काम करणारे अधिकारी नागरिकांची कामे अडकली आहेत. यामुळे रात्रीच्या गस्तीचे काम देण्यात येऊ नये, अशी मागणी महसूल कर्मचाऱ्यांनी केली होती. मात्र, त्याचाही काहीच फायदा झाला नाही. 

महसूल कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन 
वाळू माफियाने मंडळ अधिकाऱ्याला मारहाण केल्याच्या निषेधार्थ सावनेर तहसील कार्यालयात महसूल विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. घाटावर जेथे ड्युटी लावण्यात आली आहे. अशा ठिकाणी पोलिस बंदोबस्त असला तरी फिरत्या पथकाला सुरक्षा प्रदान केली नसल्याने ही घटना घडल्याचा आरोप करण्यात आला. दिवसभर सर्व कर्मचारी तहसीलच्या प्रांगणात ठिय्या मांडून होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sand smugglers attacked on circle officer in nagpur district