राजकारण्यांच्या छत्रछायेत वाळूतस्करी; धानोरातील घटनेने पितळ उघडे 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 30 November 2019

नायब तहसीलदार श्रीमती लोणारे यांना 23 नोव्हेंबरच्या रात्री वाळूतस्करांवर कारवाई करण्यासंदर्भात आदेश प्राप्त झाले. त्यानुसार रात्री अडीच वाजताच्या सुमारास महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचे पथक घेऊन तपासणी सुरू केली. 

 

गडचिरोली : प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने जिल्ह्यातील अनेक वाळूघाटांवरून तस्करांकडून वाळूची चोरी केली जात असल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी धानोरा येथील घटनेने वाळूचोरीचे पितळ उघडे पडले आहे. काही राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने बाहेरजिल्ह्यात वाळू पुरवठा करणारे तस्कर मालामाल झाले आहेत. 

नायब तहसीलदारांकडून तपासणी 

दोन वर्षांपूर्वी सिरोंचा येथील गोदावरी नदीघाटावरील वाळूतस्करीने जिल्हा प्रशासन चांगलेच चर्चेत आले होते. त्यानंतर आता धानोरा येथील प्रकार समोर आला. नायब तहसीलदार श्रीमती लोणारे यांना 23 नोव्हेंबरच्या रात्री वाळूतस्करांवर कारवाई करण्यासंदर्भात गडचिरोलीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडून तोंडी आदेश प्राप्त झाले. त्यानुसार रात्री अडीच वाजताच्या सुमारास नायब तहसीलदारांनी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचे पथक घेऊन तपासणी सुरू केली. 

Image may contain: outdoor

ट्रक घेऊन ट्रकचालक पसार 

तपासणीदरम्यान मुरुमगाव-धानोरा मार्गावर एक ट्रक आढळून आला. त्यांनी तो थांबवून चौकशी केली असता त्यातून वाळूची अवैध वाहतूक करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे श्रीमती लोणारे यांनी जप्ती पंचनामा करुन ट्रक मंडळ अधिकारी कार्यालयाजवळ लावण्यास सांगितले. परंतु, महसूल अधिकाऱ्यांना न जुमानता ट्रकचालक ट्रक घेऊन पळून गेला. 

गावकऱ्यांची अधिकाऱ्यांना दमदाटी 

त्यानंतर पथकाचे कर्मचारी धानोरा-मुरूमगाव मार्गावरील चिचोली घाटावर धडकले. तेव्हा नदीघाटावर वाहन क्रमांक नसलेला, परंतु वाळू भरलेला ट्रॅक्‍टर ट्रॉलीसह आढळून आला. ट्रॅक्‍टरकडे जात असताना अधिकाऱ्यांचे वाहन नदीपात्रातील वाळूत फसले. ते काढण्याचा प्रयत्न सुरू होता. याच वेळी जवळच्या सालेभट्टी गावातून पंधरा ते वीस महिला व पुरुष नदीघाटावर लाठ्याकाठ्या व बॅट घेऊन आले. त्यातील एका महिलेने नायब तहसीलदार श्रीमती लोणारे यांचा हात धरून ट्रॅक्‍टरवर कारवाई न करण्याची दमदाटी केली. उपस्थित नागरिकांनीही महसूल अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. याच वेळी एक व्यक्ती ट्रॅक्‍टर घेऊन पळून गेली. 

सालेभट्टीतील गावकऱ्यांवर गुन्हे दाखल 

नायब तहसीलदार लोणारे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार धानोरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यावरून पोलिसांनी भाजप नेते साईनाथ साळवे व त्यांचा मुलगा सारंग साळवे यांच्यासह गणेश भुपतवार, कपिल कुमरे, सौरभ मडकाम तसेच सालेभट्टी गावातील अन्य दहा ते वीस अज्ञात नागरिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यातील एका मंत्र्याच्या निकटवर्तीय कार्यकर्त्याकडून गोदावरी नदीतून तेलंगणात वाळूतस्करी केली जात असल्याचा प्रकार समोर आला होता. 

थेट नागपुरात होतो पुरवठा 

गडचिरोली जिल्ह्यातील वाळूला सर्वत्र मागणी असल्याने तस्करांकडून वाळू चोरीचे प्रकार होत आहेत. थेट नागपूरला वाळूपुरवठा केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. तेथे चौपट भाव मिळत असल्याने परवानगी नसतानाही अवैधरीत्या वाळूउपसा करून विक्री केली जाते. गडचिरोली शहरातही वाळूची बेभाव विक्री सुरू आहे. एकाच टीपीवर दिवसभर अनेकवेळा वाहतूक केली जात असल्याचा प्रकारही निदर्शनास येत आहे. काही ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त वाळूची साठवणूक केली आहे. परंतु, कारवाईकडे दुर्लक्ष केले जात असल्याने वाळूचोरी सुरूच आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sand Smuggling under influence of Politicians