कारागृहात तयार होणार सॅनिटरी नॅपकिन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

नागपूर - उपराजधानीतील मध्यवर्ती कारागृहात सॅनिटरी नॅपकिन उद्योगाची उभारणी करण्यात आली आहे. प्रकल्पातून दररोज दीड ते दोन हजार नॅपकिन्स उत्पादित होणार असून ते राज्यभरातील कारागृहांमधील स्त्री बंदीवानांना पुरविण्यात येणार आहेत. कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्या हस्ते शुक्रवारी या प्रकल्पाचे उद्‌घाटन करण्यात आले.

महाराष्ट्र कारागृह विभाग व मुंबईच्या टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकल्प उभारण्यात आला आहे. राज्यात केवळ नागपूर मध्यवर्ती कारागृहातच या उद्योगाची उभारणी करण्यात आली आहे. येथे उत्पादित होणारे नॅपकिन राज्यातील कारागृहातील स्त्री बंद्यांना पुरविण्यात येणार असल्याने खासगी पुरवठादाराकडून खरेदीची गरज आता राहणार नाही. नॅपकिन्स दर्जेदार, निर्जंतुक व आरामदायी राहणार असून त्याची किंमत प्रती नॅपकिन केवळ २.२५ रुपये राहील. 

कोणत्याही प्रकारची शासकीय गुंतवणूक न करता स्त्री बंदी सक्षमीकरण, कौशल्य विकास तसेच महिला बंद्यांच्या मुक्ततेनंतर पुनर्वसनासाठी उद्योग अतिशय उपयुक्त ठरणार आहे. प्रकल्पात पाच मशीनचा संच असून केवळ एक मशीनला विजेची गरज आहे. राष्ट्रीय नवप्रवर्तक प्रतिष्ठानतर्फे महिला बंद्यांना नॅपकिन्स तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील कारागृहातील महिला बंद्यांनाच उत्पादित मालाचा पुरवठा करण्यात येणार असून भविष्यात अतिरिक्त उत्पादनाची खुल्या बाजारात विक्री केली जाणार आहे. उद्‌घाटन सोहळ्याला टाटा ट्रस्टच्या प्रकल्प संचालक वर्षा कनिकदळे, नागपूर कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले, वरिष्ठ तुरुंगाधिकारी ए. आर. गावीत, कारखाना व्यवस्थापक आर. आर. भोसले उपस्थित होते.

Web Title: Sanitary napkins to be prepared in jail