‘सॅनिटरी पॅड’चा वापर वाढला, विल्हेवाट शून्य

Sanitary-Napkin
Sanitary-Napkin

नागपूर - गेल्या काही वर्षात सॅनिटरी पॅडचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला, महापालिकेने शाळांमध्ये निःशुल्क पॅडचे वितरणही केले. परंतु, या पॅडची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेकडे अद्याप उपाययोजना नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. दररोज कचरा उचल करणाऱ्या कचरा गाडीत सॅनिटरी पॅड पडत असून ते भांडेवाडीतील डम्पिंग यार्डमध्ये  टाकले जात आहे. त्यामुळे महापालिकेने परवानगी दिलेल्या कचरा उचलणाऱ्यांसह परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्याही समस्या निर्माण झाली आहे. 

शहरात दररोज १२०० टन कचरा गोळा केला जात असून भांडेवाडीतील डम्पिंग यार्डमध्ये जमा केला जातो. यावर प्रक्रियेचीही बोंब आहे. दुसरीकडे वैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी इन्सिनरेटर मशीनचा वापर केला जातो. वैद्यकीय कचरा जाळून नष्ट केल्या जाते. मात्र, महापालिका अद्याप सॅनिटरी पॅडच्या विल्हेवाटीसाठी गंभीर नसल्याचे चित्र आहे. मार्चमध्ये महापौर नंदा जिचकार यांनी महापालिका शाळांतील विद्यार्थिनींना नि:शुल्क सॅनिटर पॅडचे वितरण केले. महापालिकेच्या सर्व शाळांतील विद्यार्थिनींना एक वर्षांचे सॅनिटरी पॅड मोफत देण्यात आले. मात्र, विल्हेवाट लावण्यासाठी अद्याप कुठलीही यंत्रणा तर नाहीच, याचा आराखडाही तयार नसल्याचे सूत्राने नमूद केले. शहरात विद्यापीठासह समाजकल्याण विभाग, आदिवासी विभागाच्या मुलींच्या वसतिगृहासह मोठ्या प्रमाणात कार्यालये आहेत.

याशिवाय दहा लाखावर महिलांची लोकसंख्या असून ६० टक्के महिला सॅनिटरी पॅडचा वापर करतात. त्यामुळे सॅनिटरी पॅडचा वापर करणाऱ्या महिलांची संख्या ६० हजारांपर्यंत असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे तर  दररोज ३० हजारांवर सॅनिटरी पॅड दररोजच्या कचऱ्यात जमा होत असल्याची शक्‍यता सूत्राने वर्तविली. एका सॅनिटरी पॅडचे वजन ३० ते ३५ ग्रॅमपर्यंत असून दररोज जवळपास ९०० किलो अर्थात ९ टन सॅनिटरी पॅड कचऱ्यात जमा होत आहे. सोबतच लहान मुलांसाठी डायपर वापरणाऱ्यांची संख्याही एवढीच असण्याची शक्‍यता असून दररोज १८ ते २० टन डायपर व सॅनिटरी पॅड विल्हेवाटीशिवाय आहे. सॅनिटरी पॅड आणि डायपर हा वैद्यकीय कचरा असून त्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावण्याची गरज असताना हे सर्व भांडेवाडीतील डम्पिंग यार्डध्ये फेकले जात आहे.

वास्तव स्वीकारावे  
प्रत्येक महिला तिच्या आयुष्यातील पाळीच्या काळात ८ ते १५ हजार सॅनिटरी पॅड, टॅम्पोज आणि लिनर्स वापरते. 
लहान मुलांना साधारणतः दोन वर्षांपर्यंत डायपर घातले जाते. या काळात प्रत्येक मूल दीड ते दोन हजार डायपर्स वापरते. 
देशातील ३५ कोटी ५० लाख महिलांपैकी केवळ १२ टक्के महिलांना सॅनिटरी पॅड घेणे परवडते.
येत्या पाच वर्षांत सॅनिटरी पॅड वापराचे प्रमाण दुप्पट होण्याची शक्‍यता आहे, पण विल्हेवाटीचे नियोजन नाही. 

‘सुपर हायजिन’कडून अहवालाची प्रतीक्षा 
शहरात वैद्यकीय कचरा गोळा करून त्यावर प्रक्रियेचे काम सुपर बायोमेडिकल कंपनीला देण्यात आले आहे. शहरातील ६ ते ७ वसतिगृहातून सॅनिटरी पॅड गोळा करण्यात येत आहे. या वसतिगृहातून सॅनिटरी पॅडची उचल करून त्यावर प्रक्रियेचे काम तूर्तास सुपर बायोमेडिकलला देण्यात आले. दररोज जमा होणारे पॅडच्या अनुषंगाने या कंपनीकडून अहवाल मागितल्याचे सूत्राने नमूद केले. परंतु, अद्याप अहवाल न आल्याने पुढे काहीही करता येत नसल्याची पुस्तीही सूत्राने जोडली. 

पुणे महापालिकेकडून धडा घेण्याची गरज 
पुण्यात गेल्या चार वर्षांत बारा प्रभागांमध्ये इन्सिनरेटर मशीन बसविण्यात आली असून दिवसाला दहा हजारांहून अधिक पॅडची विल्हेवाट लावण्यात येत आहे. या प्रकल्पाची जबाबदारी स्वयंसेवी संस्थांना देण्यात आली आहे. सध्या प्रत्येक प्रकल्पामध्ये दिवसाला सुमारे ७५० ते ९०० सॅनिटरी पॅड जमा होतात. त्यासाठी कचरावेचकांची स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com