युवा अभियंत्याचा अभिनव प्रयोग! घरीच तयार केले सॅनिटायझर मशीन

nandgaopeth
nandgaopeth

नांदगावपेठ (जि. अमरावती) : अमरावती जिल्ह्यातील दिवसेंदिवस वाढत असलेले कोरोनासंक्रमित रुग्णांचे प्रमाण चिंताजनक आहे. शिवाय ग्रामीण भागातदेखील हे प्रमाण कमी होण्याची चिन्हे नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे ग्रामीण भागातील नागरिक वारंवार हात सॅनिटाइज करीत नाहीत. म्हणूनच येथील युवा अभियंता दर्शन अशोक जपूलकर याने घरगुती वापरासाठी सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात इलेक्‍ट्रिकवरील सॅनिटायझर मशीन तयार केले आहे. विशेष म्हणजे, एक मॉडेल बनविल्यानंतर या मशीनची मागणीदेखील वाढलेली आहे.

अमरावतीच्या प्रवीण पोटे इंजिनिअरिंग महाविद्यालयातून दर्शनने इलेक्‍ट्रॉनिक्‍स ऍण्ड टेलिकम्युनिकेशनमध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केले असून तो पुण्यातील रिलायन्स सोलर कंपनीमध्ये अभियंता आहे. कोरोनामुळे तो सध्या नांदगावपेठ येथील मूळ गावी असून वर्क फ्रॉम होम करतो आहे. सोबतच फावल्या वेळात आत्मनिर्भर भारत अंतर्गत त्याने ऑटोमॅटिक सॅनिटाइजर मशीन तयार केले. यामध्ये अल्ट्रासोनिक सेन्सर, महागडे कंट्रोलर, पुठ्ठा व एक लिटर पाण्याची बाटली वापरून सर्वसामान्य नागरिकांना परवडेल, अशा माफक दरात त्याने हे यंत्र बनविले आहे.

वारंवार बाटलीमधील सॅनिटाइजर काढणे व हाताला लावणे याचा सर्वांना कंटाळा येतो. मात्र हा कंटाळा स्वतःसाठी तसेच कुटुंबातील इतरांसाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे घराच्या मुख्य द्वारावर ही मशीन बसविली तर घरातील प्रत्येक सदस्य किंवा पाहुणे घरात प्रवेश करताना मशीन समोर हात ठेवून सॅनिटाइज करू शकतात. अशाप्रकारची मशीन बाजारात अधिक दराची असल्याने सर्वसामान्य नागरिक ते घरी घेऊ शकत नाही. त्यामुळे दर्शन जपूलकर या अभियंत्याने फावल्या वेळात हे यंत्र तयार करून सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. एक यंत्र तयार करायला चार ते पाच तासांचा अवधी लागत असून ना नफा ना तोटा, या तत्त्वावर सर्वसामान्य नागरिकांसाठी ते उपलब्ध आहे. या यंत्राचे कौतुक होत असून नागरिकांची मागणीदेखील वाढली आहे.

सविस्तर वाचा - हाय रे कोरोना, बेरोजगारीला कंटाळून दोन युवकांनी संपविले जीवन

नागरिकांनी सतर्क राहावे
हा काळ फार वाइट आहे. ग्रामीण भागातदेखील रुग्णांची संख्या वाढली आहे. नागरिकांनी सतर्क राहणे, सॅनिटाइजर व मास्क वापरणे तसेच सामाजिक अंतर पाळणे हाच कोरोनापासून बचावाचा मार्ग आहे. त्यामुळेच हे यंत्र तयार केले असून सॅनिटाइजर मशीनसोबत सॅनिटाइज आणि हॅंडवॉश एकाच मशीनमधून होईल, असे यंत्र लवकरच बनवणार असल्याचे दर्शन जपूलकर याने माध्यमांशी बोलताना सांगितले.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com