ज्येष्ठ नेपथ्यकार संजय काशिकर यांचे निधन 

ज्येष्ठ नेपथ्यकार संजय काशिकर यांचे निधन 

नागपूर - नागपूरचे ज्येष्ठ रंगकर्मी आणि विदर्भातील आघाडीचे नेपथ्यकार संजय काशिकर यांचे आज (सोमवार) सकाळी साडेनऊच्या सुमारास निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी व मुलगी तसेच बराच मोठा आप्त परिवार आहे. सहकारनगर घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तीन दशकांपेक्षा अधिक काळ रंगभूमीची प्रामाणिक सेवा करणाऱ्या या कलावंताची अचानक एक्‍झीट सर्वांना चटका लावून गेली. 

दोन आठवड्यांपूर्वी सोनेगाव येथील त्यांच्या निवासस्थानावरून ते एका कामासाठी बाहेर पडले. खामला चौकात त्यांचा अपघात झाला. शरीरावर फारशा जखमा नसल्या तरी मेंदूला आतून जबर मार बसला होता. त्यांना तातडीने ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवस उपचारानंतर मेंदूवरील उपचारासाठी धंतोली येथील न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये त्यांना हलविण्यात आले. गेले दहा दिवस डॉक्‍टर शर्थीचे प्रयत्न करीत होते. मात्र, आज पहाटेपासून त्यांची प्रकृती खालावली आणि साडेनऊच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. नाटकाचे नेपथ्य म्हटले की संजय काशिकर हे एकमेव नाव जुन्या-नव्या रंगकर्मींच्या ओठावर असायचे. त्यांच्या तालमीत अनेक नेपथ्यकार, रंगभूषाकार आणि नटही घडले. राज्य नाट्य स्पर्धेत त्यांचा विशिष्ट दबदबा होता. अत्यंत शांत आणि मनमिळावू स्वभावाचा रंगकर्मी म्हणून त्यांची ख्याती होती. 

संजय काशिकर यांचे नेपथ्य असलेल्या नाटकांची संख्या सहजासहजी सांगता येईल अशी नाहीच. पण, शिवकथाकार विजयराव देशमुख यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त सादर झालेल्या "सिंहासनाधिश्‍वर' नाटकासाठी त्यांनी पूर्णपणे नवीन नेपथ्य तयार केले होते. फेब्रुवारीमध्ये सायंटिफिक सोसायटीच्या सभागृहात झालेल्या या प्रयोगासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. सप्तकच्या आगामी एकांकिका महोत्सवासाठी ते तयारीला लागले होते. मात्र, काळ आडवा आला. आयुष्यभर नाटक जगलेले संजय काशिकर यांचे नाव आता नेपथ्यापुढे नसेल, ही हळहळ कायम राहील. 

तरी मुलीने सोडवला पेपर! 
संजय काशिकर यांची मुलगी अवनी एलएडी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. आज दुपारी अडीच वाजता तिचा प्रथम वर्षाचा पेपर होता. गेल्या दोन आठवड्यांपासून वडील दवाखान्यात मृत्यूशी झुंज देत असताना तिने स्वतःला धीट ठेवले व आईची काळजी घेतली. आज सकाळी वडील गेल्याचे कळल्यानंतर तिने स्वतःला सावरले आणि पेपरला जाण्याचा निश्‍चय केला. वडिलांचा मृतदेह न्यूरॉन हॉस्पिटलमधून शवविच्छेदनासाठी मेडिकलकडे रवाना झाला, त्याचवेळी अवनी पेपर सोडवायला गेली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com